“चोरीच्या मामल्यावर” रोहित पवारांचे दरेकरांना चोख प्रत्युत्तर


मुंबई – राज्यातील कोरोनाचा फैलाव चिंताजनक पातळीवर पोहोचला असून कोरोना लस तसेच कोरोनावरील उपचारात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधांचा राज्यात मोठा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णांवरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला असून, आता या रेमडेसिविरवरून राजकारणही पेटले आहे.

गुजरातमधील कार्यालयामधून भाजपने रेमडेसिविर मोफत वाटल्याने त्यावर राष्ट्रावादीने टीका केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का?” असा सवाल प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांना विचारला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी प्रवीण दरेकर यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

रेमडेसिवीर औषधाचा देशामध्ये तुटवडा असताना सूरतमधील भाजप कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे, हे राजकारण नाही तर काय आहे?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विचारला होता. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिवीर चोरून आणले आहेत का? असा सवाल दरेकरांनी विचारला होता. दरम्यान आता रोहित पवार यांनी दरेकरांना उत्तर दिले आहे.


आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आदरणीय प्रवीण दरेकर साहेब रेमडेसिविरचे बॉक्स हे शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी वेल्फेअर निधीमधून सोलापूर आणि इतर जिल्ह्यामधील गरीब, गरजू रुग्णांना प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत देता यावेत यासाठी दिले आहेत. तुमच्याप्रमाणे हे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवले नाही.