गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट; ठाकरे सरकारकडून नियमावली जाहिर


मुंबई – कोरोनाचा राज्यात वाढत असलेला कहर पाहता पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा विचार ठाकरे सरकार करत आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनही लावला आहे. वारंवार लोकांना मास्क लावण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्यामुळे सणांवरही निर्बंध आले आहेत. यामुळे मंगळवारी होणार गुढीपाडव्यावर देखील कोरोनाचे सावट असून ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली प्रसिद्द केली आहे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. नियमावलीनुसार, गुढीपाडवा सण सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत साधेपणाने साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

आवर्जून सोनेखरेदी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर केली जाते, परंतु कोरोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अंमलात आणले आहेत, परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात सराफ बाजाराला सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी साधता आली नाही. काही दिवसांपासून सोन्याचे दर कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची व्यापाऱ्यांना आशा होती. पण बाजारपेठ बंद असल्याने कोट्यावधी रुपयांचा फटका बसणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरचित्र संवाद माध्यमातून अनेक व्यापारी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजमाध्यमांवर जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंचे दागिने आणि वस्तू विक्रीतील काही मोठ्या ब्रँड्सनी ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांना दिला आहे.