पेरू देशातील आगळा वेगळा सोहळा- ‘ताकानाकाय’

Takanakuy
दरवर्षी नाताळचा सण आला, की भव्य क्रिसमस ट्रीज् , त्यांवर केलेली सुंदर सजावट, आकर्षक रोषणाईने झगमगणारी घरे, इमारती आणि रस्ते, नाताळाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या मेजवान्या, आप्तेष्ट आणि मित्रमंडळींच्या गाठी-भेटी, आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू हे वातावरण एकीकडे पहावयास मिळत असतानाच, पेरू देशामधील ‘चंबीविलीकास’ प्रांतातील लोक मात्र एका आगळ्याच सोहळ्याची तयारी करीत असतात. हा सोहळा म्हणजे सार्वजनिक ‘मुष्टीयुद्ध’ ! या सोहळ्यामध्ये होणाऱ्या ‘ताकानाकाय’ नामक सार्वजनिक ‘फिस्ट फाईटस् ‘ किंवा मुष्टियुद्धासोबतच संगीत, नृत्य, तऱ्हे-तऱ्हेचे चविष्ट खाद्यपदार्थ आणि अर्थातच मद्यपान यांचीही रेलचेल असते.
Takanakuy1
सर्व वयोगटातील लोक या सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी होताना पहावयास मिळतात. अगदी लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सर्वच जण आकर्षक, रंगेबिरंगी पोशाख परिधान करून ‘ताकानाकाय’ मध्ये सहभागी होत असतात. या पारंपारिक सोहळ्याची सुरुवात ‘सँटो टोमास’ नामक पहाडी प्रांतामध्ये झाली असून, हा प्रांत पेरू देशातील सर्वात निर्धन प्रांत म्हणून ओळखला जातो. हा प्रांत दुर्गम डोंगरी भागांमध्ये असल्याने येथील नागरिकांचा, देशातील इतर भागांशी फारसा संपर्क नाही. आपापसातील भांडणे किंवा वादविवाद दूर करण्यासाठी कोर्ट-कचेऱ्यांच्या फंदात न पडता, नाताळच्या सणाचे निमित्त साधून एकमेकांना मारून हे वाद विवाद मिटविण्याची परंपरा ‘ताकानाकाय’ या सोहळ्यामार्फत पार पाडली जात असते.
Takanakuy2
‘ताकानाकाय’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘रक्त उकळत असताना’, म्हणजेच ‘अतिशय राग आलेला असताना’, असा आहे. नाताळच्या दिवशीच्या आदल्या संध्याकाळी या सोहळ्याचे आयोजन केले जात असते. भांडणे लहान असोत, वा मोठी, त्यांचा सोक्षमोक्ष या सोहळ्याच्या दरम्यानच लागला पाहिजे अशी परंपरा आहे. या सोहळ्यासाठी लोक रंगेबिरंगी पारंपारिक पोशाख परिधान करीत असून, स्वतःची ओळख लपविण्यासाठी चेहऱ्यावर ‘मास्क’ही लावीत असतात. या सोहळ्याची तयारी मुख्य दिवसाच्या काही दिवस आधीपासूनच केली जाते. मुख्य सोहळ्याच्या दिवशी भव्य मिरवणूक निघून त्यानंतर सार्वजनिक ‘ताकानाकाय’ चा कार्यक्रम सुरु होतो.
Takanakuy3
मुष्टियुद्धामध्ये सहभागी होण्यापूर्वी लोक आपल्या हातांच्या भोवती स्कार्फ गुंडाळतात. त्यानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याशी हस्तांदोलन केल्यानंतर मुष्टियुद्ध सुरु होते. मुष्टियुद्ध समाप्त झाल्यानंतर दोन्ही खेळाडू पुन्हा हस्तांदोलन करून आपल्यातील वादविवाद संपुष्टात आल्याची ग्वाही देतात. मुष्टियुद्धाच्या या आगळ्या वेगळ्या सोहळ्यानंतर सर्व जण एकत्र भोजनाचा आणि मद्यपानाचा आनंद घेतात. ‘ताकानाकाय’चा हा ‘हटके’ सोहळा आता पेरू देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही आयोजित केला जात असतो.

Leave a Comment