असे आले भारतामध्ये ‘आईस’ आणि ‘आईस्क्रीम’

ice
आताच्या अतिप्रगत काळामध्ये जेव्हा घरोघरी फ्रीज आणि फ्रीझर्स, एसी, अशी उपकरणे सर्रास पहावयास मिळतात तेव्हा या वस्तूंचा उपयोग करताना, एकोणिसाव्या शतकामध्ये या वस्तूच काय, तर साधे बर्फ घातलेले थंडगार पाणी देखील केवळ अतिश्रीमंत लोकांच्या घरी मिळणारी चैनीची वस्तू होती असे म्हटले तर यावर सहजासहजी आपला विश्वास बसत नाही. पण एकोणिसाव्या शतकाच्या काळामध्ये भारतामध्ये बर्फ अमेरिकेमधून आयात केला जात असे, हे वास्तव आहे. भारतामध्ये बर्फ निर्यात करण्याची आणि या बर्फाचा वापर करून आईस्क्रीम तयार करण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरविल्याने फ्रेडरिक ट्युडर या अमेरिकन व्यावसायिकाच्या अवघ्या आयुष्याचे सोने झाले. मुळात भारतामध्ये केवळ ‘आईस’, म्हणजे बर्फ निर्यात करणाऱ्या ट्युडरने आईस्क्रीमची कल्पना भारतामध्ये आणून, ते बनविण्यासाठी बर्फाची मागणी कायम राहील याची काळजी घेत या व्यवसायातून अपार संपत्ती कमविली.
ice1
अशा वेळी, भारतामध्ये बर्फाच्छादित प्रदेश असतानाही अमेरिकेतून बर्फ मागविण्याचे काय कारण होते असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर भारतामध्ये प्रचलित असलेल्या बर्फाच्या व्यापारपद्धतीमध्ये आहे. भारत हा उष्ण कटिबंधातील देश असल्याने बहुतेक सर्व ठिकाणी वर्षाचे काही दिवस सोडले तर बहुधा इतर सर्व दिवस तापमान उष्ण असे. त्यामुळे पिण्यासाठी थंड पेयांची, पाण्याची आवश्यकता कायम पडत असे. किंबहुना, सातव्या शतकामध्ये बाणभट्टाने लिहिलेल्या ‘हर्षचरित्र’ या कन्नौजच्या राजा हरिश्चंद्राच्या जीवनीमध्ये देखील थंड पेयांचा उल्लेख सापडतो. राजा हरीशचंद्रासाठी बनविले जाणारे ताजे ताक थंड राहावे यासाठी बर्फाने भरलेल्या मोठमोठ्या बादल्यांमध्ये ही ताकाची आणि इतर पेयांची भांडी ठेवली जात असून हा बर्फ हिमालायामधून आणविला जात असल्याचा उल्लेख बाणभट्टांनी आपल्या लेखनामध्ये केला आहे.
ice2
आजच्या काळामध्ये निरनिराळ्या स्वादांमध्ये उपलब्ध असलेल्या ‘आईस लॉलिज’, म्हणजेच बर्फाचे गोळे मूळचे चीनमधील असून, तेराव्या शतकामधे ‘सिल्क रूट’च्या माध्यमातून या बर्फाच्या गोळ्यांची ख्याती मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहोचली. मध्य आशियामधून भारतामध्ये आलेल्या मुघलांच्या सोबत बर्फ भारतामध्ये पोहोचला. १५८६ साली काश्मीर प्रांतावर आधिपत्य स्थापित केल्यानंतर मुघल सम्राटांसाठी हिमालायामधून हत्ती आणि घोड्यांवर लादून बर्फ आणला जात असे. हिमाचल प्रदेशातील चुरधर पर्वतावरून ही बर्फ आणविला जात असे. याचा उल्लेख ‘ऐन-ऐ-अकबरी’ या ग्रंथामध्येही सापडतो. बर्फाची वाढती मागणी लक्षात घेऊन दिल्ली आणि आग्रा प्रांतांमध्ये विशालकाय ‘आईस पॅन’ बनविण्यात आले असून, कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये या मोठमोठ्या भाड्यांमध्ये बर्फ बनविण्यात येत असे. बर्फ गोठलेले राहवे म्हणून ही भांडी जमिनीमध्ये खणलेल्या खड्ड्यांमध्ये ठेवण्यात येत असत.
ice3
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकामध्ये युरोपियनांचे भारतामध्ये आगमन झाल्यानंतर बर्फाची मागणी अधिकच वाढली. त्यावेळी हिमालयातील अनेक नद्या थंडीच्या काळामध्ये गोठल्यानंतर त्या नद्यांमधून बर्फ आणला जाऊ लागला. मात्र अशा प्रकारे बर्फ खणून काढणे आणि इतक्या लांब पोहोचविणे यामध्ये पैसा आणि वेळ जास्त खर्च होऊ लागला. त्यामुळे बर्फ अर्थातच महागला आणि चैनीची, केवळ श्रीमंतांना परवडेल अशी वस्तू म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावेळी अमेरिकन व्यावसायिक फ्रेडरिक ट्युडर यांनी भारतमध्ये बर्फाच्या मागणीची पूर्तता करण्याचा अनोखा उपाय शोधून काढला. त्याकाळी बर्फ तयार केला तरी तो गोठलेल्या अवस्थेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे सर्वात महत्वाचे असे. यावर उपाय शोधून काढत लाकडाच्या भुश्श्यामध्ये बर्फ पेटीबंद करून पाठविल्याने तो जास्त वेळ गोठलेला राहत असल्याचे ट्युडर यांच्या लक्षात आले. याच उपायाचा अवलंब करीत १८३३ साली ट्युडर आईस कंपनी या आपल्या व्यवसायाच्या मार्फत ट्युडर यांनी भारतामध्ये बर्फाची निर्यात सुरु केली. १८३३ साली ट्युडर आईस कंपनीने पाठविलेला १८० टन बर्फ घेऊन ‘टस्कनी’ हे मालवाहू जहाज जेव्हा बोस्टनहून कलकत्त्याच्या बंदरावर पहिल्यांदा आले, तेव्हा बर्फाचा इतका प्रचंड साठा पाहून बघ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले !
ice4
हा बर्फ साठविण्यासाठी ट्युडर आईस कंपनीच्या वतीने मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे मोठी ‘आईस हाऊस’ बांधण्यात आली. मात्र केवळ पेये थंड रहावीत या पलीकडे बर्फाचा उपयोग कसा करावा याची लोकांना सुतराम कल्पना नसल्याने ट्युडर यांनी लोकांना पडलेला हा प्रश्न सोडवीत बर्फाच्या पाठोपाठ ‘आईस्क्रीम’ ची कल्पनाही भारतामध्ये आणली. त्याकाळी आईस्क्रीम हा पदार्थ अमेरिकेमध्ये लोकप्रिय होऊ लागला होता. पण आपल्या कंपनीने पाठविलेला बर्फ खपावा आणि त्यासाठी मागणी आणखी वाढावी या साठी ‘आईस्क्रीम’ची कल्पना भारतामध्ये आणली गेली. पाहता पाहता हा पदार्थ इतका लोकप्रिय होऊ लागला, की हा वारंवार खाऊन लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरु झाला ! तसेच आधीच महाग असलेल्या बर्फापासून तयार करण्यात येत असलेला हा पदार्थ केवळ श्रीमंतांना परवडण्यासारखा असल्यामुळे पाहुण्यांना मेजवानीला बोलाविले असता आईस्क्रीम हा पदार्थ खाऊ घालणे हे ‘स्टेटस सिम्बल’ म्हणून पाहिले जाऊ लागले. १८५५ सालापर्यंत मात्र बर्फ गोठविण्याची अनेक तंत्रज्ञाने विकसित झाल्याने बर्फ आयात करण्याची गरज संपुष्टात आली, आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी गोठवून बर्फ बनविता येऊ लागल्याने बर्फ ही एके काळी चैनीची म्हणून ओळखली जाणारी वस्तू सर्वसामान्यांनाही उपलब्ध होऊ लागली.

Leave a Comment