सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यातील विविध इमारतींच्या बांधकामासाठी निधी वितरित


मुंबई – विविध विभागांच्या मागणीनुसार राज्याच्या वेगवेगळ्या भागातील इमारतींच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्यात आला आहे. यातून लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या इमारती पूर्ण होतील असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

पुण्यातील विविध इमारतींच्या बांधकामांसाठी 9 कोटी 31 लाखांचा निधी वितरित

सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून पुण्यातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी तसेच मोशी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागीय कार्यशाळा व प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी सुमारे 9 कोटी 49 लाख 31 हजार इतका निधी वितरित केला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

महिला व बालविकास विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या निधीची मागणी केली होती. त्यानुसार महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी पुण्यात निवासस्थाने बांधकामासाठी 18 लाख रुपये वितरित करण्यात आले असून अन्न व औषध प्रशासन विभागाचे मोशी येथे विभागीय कार्यालय व प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकाम व इतर अनुषंगिक कामांसाठी 9 कोटी 31 लाख 31 हजार इतकी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाने वितरित केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमरावतीतील जिल्हा महिला रुग्णालयाच्या अतिरिक्त बांधकामासाठी 6.86 कोटी निधी वितरित

अमरावतीतील जिल्हा महिला रुग्णालयात 200 खाटांच्या अतिरिक्त रुग्णालयाच्य बांधकामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 6 कोटी 86 लाख इतका निधी वितरित केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने अमरावतीतील जिल्हा महिला रुग्णालयात अतिरिक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. या मागणीनुसार, या इमारतीच्या बांधकामासाठी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा निधी वितरित करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

याचबरोबर अमरावतीतील कुष्ठरोग धामाच्या परिरक्षणासाठी 1 लाख 25 हजार रुपयांचे सहायक अनुदानही वितरित करण्यात आले आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 93 लाखांचा निधी

अमरावतीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराभोवती सुरक्षा भिंत व प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी 93.44 लाख रुपयांचा निधीही वितरित करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यानुसार सन 2020-21 या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून हा निधी वितरित केल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

कराडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय व इलेक्ट्रॉनिक इमारत बांधकामासाठी 2.45 कोटींचा निधी वितरित

कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय इमारत व इलेक्ट्रॉनिक इमारत बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण 2 कोटी 45 लाखांचा निधी वितरित केला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मागणी केल्यानुसार, कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारत बांधकामासाठी 1 कोटी 5 लाख आणि इलेक्ट्रॉनिक इमारत बांधकामासाठी 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी सन 2020-21 या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वितरित करण्यात आला आहे.

तासगावच्या शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन इमारतीच्या बांधकामासाठी 2 कोटी 99 लाखांचा निधी वितरित

तासगाव (जि. सांगली) येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनच्या इमारत संकुलाच्या बांधकामासाठी सन 2020-21च्या अर्थसंकल्पित तरतुदीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने 2 कोटी 99 लाख 65 हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तासगावच्या शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनच्या इमारत संकुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची मागणी केली होती. पुरवणी मागणीमध्ये ही बाब मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने या इमारत संकुलाच्या बांधकामासाठी निधी वितरित केला आहे.

रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत विस्तारीकरणासाठी 48.57 लाखांचा निधी वितरित

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य इमारतीच्या विस्तारीकरण बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 48 लाख 57 हजार इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य इमारत विस्तारीकरणासाठी निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्या मागणीनुसार, सन 2020-21 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 48 लाख 57 हजार इतका निधी वितरित केला आहे.

सातारा, उस्मानाबाद, नागपूर, चंद्रपूरमधील विश्रामगृहांच्या बांधकामासाठी 3.51 कोटी रुपये वितरित

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षण बंगले व विश्रामगृहे अंतर्गत इमारत बांधकामासाठी सन 2020-21 या वर्षासाठी मार्चअखेरपर्यंत 3 कोटी 51 लाख 11 हजार इतका निधी वितरित केला आहे. हा निधी सातारा, उस्मानाबाद, नागपूर, चंद्रपूर या मंडळामध्ये वितरित करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षण बंगले व विश्रामगृहाच्या इमारत बांधकामांसाठी सातारा मंडळासाठी 13 लाख 17 हजार, उस्मानाबाद बांधकाम मंडळासाठी 1 कोटी 49 लाख 52 हजार, नागपूरसाठी 6 लाख 56 हजार आणि चंद्रपूर बांधकाम मंडळासाठी 1 कोटी 81 लाख 86 हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुरुंग व परिवहन विभागाच्या इमारत बांधकामासाठी 5 कोटी 19 लाखांच्या निधीचे वितरण

गृह (तुरुंग) विभागाच्या बारामती शहर पोलीस कारागृहाच्या बांधकामासाठी तसेच परिवहन विभागाच्या इमारत बांधकामासाठी सन 2020-21 या वर्षाच्या तरतुदीतून सुमारे 5 कोटी 19 लाख 58 हजार इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने वितरित केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

गृह (तुरुंग) विभागाने बारामती शहर पोलीस कारागृह इमारतीच्या बांधकाम व इतर अनुषंगिक कामांसाठी 2 कोटी 40 लाख 2 हजार इतक्या निधीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती. तसेच परिवहन विभागानेही इमारतीच्या बांधकामासाठी 2 कोटी 79 लाख 56 हजार इतका निधी मागितला होता. मार्च अखेरीस या दोन्ही विभागाच्या मागणीनुसार निधी वितरित करण्यात आला आहे.