जागतिक इतिहासामध्ये असे तानाशाह होऊन गेले, ज्यांच्या हाती सत्ता आल्यानंतर आपल्या मर्जीप्रमाणे कारभार चालविण्यासाठी त्यांच्या मनाला येतील ती धोरणे त्यांनी आत्मसात केली. आपल्या मर्जीप्रमाणे कारभार चालावा यासाठी अनेक जाचक नियम या तानाशाहांनी अंमलात आणले, आणि ज्यांनी हे नियमबाह्य वर्तन करण्याची हिम्मत केली, त्यांची गय केली नाही. नागरिकांसाठी नियम लागू करताना अनेक तानाशाहांनी काही अजब नियमही लागू केले होते. सद्दाम हुसेन इराकचे तानाशाह असून, इराकवर सत्ता गाजविण्यासाठी आपल्याला साक्षात परमेश्वराने पाठविले असल्याचा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा साक्षात देवाचा निर्णय असल्याचा सद्दाम यांचा विश्वास असून, या निर्णयाला विरोध करणाऱ्याची गय केली जात नसे.
या तानाशाहांचे असे ही हट्ट !
युगांडाचे तानाशाह इडी अमीन यांना केवळ युगांडाचे राष्ट्राध्यक्ष म्हणविणे कमीपणाचे वाटत असे. म्हणूनच त्यांनी आपले नाव ‘इडी अमीन, कायमस्वरूपी राष्ट्राध्यक्ष, भूतलावरील सर्व जीवित प्राणीमात्रांचे स्वामी, समुद्रातील सर्व जलचरांचे अधिपती, आणि आफ्रिकेतील ब्रिटीश साम्राज्याचे सत्ताधीश’ असे घेतले जावे असा हुकुम जारी केला होता. अमीन यांना स्कॉटलंड अतिशय प्रिय असून, स्कॉटलंडवर आपली सत्ता असल्याचे सांगत राणी एलिझाबेथशी विवाह करण्याची देखील अमीन यांची इच्छा होती !
मध्य आफ्रिकेचे तानाशाह जिआन बेडेल बोकासा यांनी तत्कलीन राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. आपल्या कारकीर्दीमध्ये केलेल्या अनेक अत्याचारांसाठी बोकासा यांना न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनाविली, मात्र नंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर बोकासा यांनी आपण येशू ख्रिस्ताचे अवतार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली होती. सोव्हियत संघाचे तानाशाह जोसेफ स्टालिन यांना त्यांच्या खासगी शयनकक्षामध्ये कोणी ही प्रवेश केलेला खपत नसे. त्यांचा हा हट्ट त्यांना चांगलाच महागात पडला. जेव्हा स्टालिन यांना हृद्यविकाराचा झटका आला, तेव्हा खासगी शयनकक्षामध्ये प्रवेश करण्याची मुभा कोणालाही नसल्याने स्टालिन यांना वैद्यकीय मदत मिळून शकली नाही व त्यांचा अंत झाला.