…त्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही; विजय वडेट्टीवार


मुंबई – कोरोनाबाधितांची संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ असल्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, त्याचबरोबर वीकेण्ड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे या निर्बंधाला व्यापाऱ्यांकडून विरोध होत असताना विरोधकांकडूनही निर्बंध शिथील करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन राज्यात लागू करण्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. त्यांनी ही माहिती टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

राज्यात आज मध्यरात्रीपासून विकेण्ड लॉकडाऊन सुरु होत असून त्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात विकेण्ड लॉकडाऊनची आवश्यकता होती. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे, हा आकडा पुढील १० दिवसांत १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावे लागेल.

कितीही उपाययोजना परिस्थिती हाताळण्यासाठी केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे वीकेण्ड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यास सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर कडक लॉकडाऊन केल्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. कोरोनाचा प्रसार झालेला असून अशा परिस्थितीत पूर्णत: लॉकडाऊनची आवश्यकता असून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.

मी काँग्रेसचा मंत्री म्हणून नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून महाराष्ट्रात जी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जी सापत्न वागणूक केंद्र सरकार देण्यात आहे त्यामुळे ही मागणी करत आहे. राज्यात आज मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुजरातसारख्या राज्याला मोठ्या प्रमाणात लस दिली जाते. इतर राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिली जाते. महाराष्ट्रात लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु केले होते, पण आता केंद्र बंद पडल्याची वेळ असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राने पाच लाख लसी खराब केल्या असे, प्रकाश जावडेकर म्हणतात. महाराष्ट्र तर खाली आहे. इतर राज्ये पुढे आहेत. महाराष्ट्रामध्ये राजकारण केले जाऊ नये अशी माझी विरोधकांना विनंती आहे. लोकांचा जीव जात असून उपाय सुचवा, त्यावर आम्ही विचार करु. जेव्हा एमपीएससची परीक्षा रद्द केली तेव्हा भाजपा रस्त्यावर उतरला, त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या अडीच लाख मुलांना कोरोना झाला आहे. यामुळे परीक्षा रद्द करा अशी मागणी आता होत असल्याचे विजय वडेट्टीवारांनी सांगितलं.

मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध आणण्याचेही संकेत विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. लोकल प्रवासासाठी काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा द्यायला पाहिजे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे लोकल प्रवासाचे नवे धोरण आखण्याची गरज, असल्याचे त्यांनी म्हटले.