केंद्राने महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला आहे का? – चिदंबरम


नवी दिल्ली : आता कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून देशातील राजकारण तापले आहे. कोरोना लस पुरवठ्यावरून महाराष्ट्राशी केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरशासमोर उभे रहावे आणि स्वत: ला प्रश्न विचारावा की महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केंद्राने केला आहे का? असा प्रश्नही त्यांना विचारला आहे.


सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार काही जठील तथ्यांच्या आधारे महाराष्ट्राला कोरोनाच्या प्रसारावरून लक्ष्य करत आहे. आतापर्यंत आपल्या 80 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण महाराष्ट्राने पूर्ण केले आहे. यामध्ये जवळपास 20 राज्ये ही महाराष्ट्राच्या मागे आहेत. महाराष्ट्राने आतापर्यंत 73 टक्के फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली आहे. यामध्ये केवळ पाच राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे.


पी. चिदंबरम म्हणाले की, महाराष्ट्राचा ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत पाचवा क्रमांक आहे. या सर्व गोष्टी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतात. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आरशासमोर उभे रहावे आणि स्वत:ला प्रश्न विचारावा की केंद्राने महाराष्ट्राला आवश्यक तेवढ्या कोरोनाच्या लसींचा पुरवठा केला आहे का?


जो काही गोंधळ देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात निर्माण झाला आहे, तो केंद्रानेच घातल्याचा आरोप माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिंदंबरम यांनी केला आहे. केंद्राने घातलेल्या या गोंधळामुळेच राज्यांना आपश्यक त्या प्रमाणात कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.