केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर


मुंबई – राज्यात तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गरज आहे तितक्या वेगाने केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्याची तक्रारही त्यांनी केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत कोरोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लसींचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या टीकेला मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

आपले अपयश महाराष्ट्र सरकार लपवत नाही. राजेश टोपेच या बाबतीत जास्त सांगू शकतील. पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचा, संकटात आणण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. जागतिक आरोग्य संघटनादेखील महाराष्ट्र सरकार काय करत आहे याची दखल घेत आहे. त्याचबरोबर गुजरात उच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. महाराष्ट्र एक मोठे राज्य असल्यामुळे सर्वात जास्त दबाव आहे. आर्थिक, लस, वाढती रुग्णसंख्या अशा अनेक गोष्टींचा दबाव आहे. केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता जनतेची सेवा केली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून लसींचा तुटवडा असल्यासंदर्भात केली गेलेली वक्तव्य म्हणजे कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये राज्य सरकारला आलेल्या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. राज्यात कोरोनाबाधित झपाट्याने वाढत असून साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयश ठरले आहे.

त्यात लससाठ्यावरून लोकांमध्ये घबराट निर्माण करणे म्हणजे समस्येत आणखी भर घालण्यासारखे आहे, अशा शब्दांत हर्षवर्धन यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कोणत्या राज्याला किती लसींचा पुरवठा होत आहे, याची अद्ययावत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेत असते. राज्य सरकारच्या लसींच्या गरजेचा सातत्याने आढावा घेतला जात असतो. त्यामुळे लसींचा तुटवडा असल्याचा महाराष्ट्राचा दावा बिनबुडाचा असल्याचेही हर्षवर्धन यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाबाधित व्यक्तींना ‘वैयक्तिक वसुली’साठी संस्थात्मक विलगीकरणातून बाहेर पडण्याची मुभा दिली जाते. राज्य सरकार नियम मोडून अख्ख्या महाराष्ट्राला संकटाच्या खाईत लोटत आहे. एकामागून एक संकटाचा सामना महाराष्ट्र करत असताना राज्य नेतृत्वाने मात्र डोळे मिटून घेतले असल्याचा टीकेचा भडिमार हर्षवर्धन यांनी केला.