राज्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये एकूण 216 जागांसाठी पदभरती


नाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात 14 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रात एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार असून याकरिता 30 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या 25 शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी च्या वर्गात साधारण 6000 पेक्षा अधिक अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्राकडून महाराष्ट्रात या एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये प्राचार्य (16), उप-प्राचार्य (08), टी.जी.टी. (इंग्रजी, फिजिक्स, गणित, अर्थशास्त्र, बायोलॉजी, कॉमर्स)(28) आणि पी.जी.टी (इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र) (164) अशा एकूण 216 जागांसाठी पदभरती होणार आहे. या पदांसाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत https://recruitment.nta.nic.in/WebinfoEMRSRecruitment या संकेतस्थळावर करावे.

पदभरतीकरिता होणारी परीक्षा ही तीन तासांची असून ही परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जून 2021 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तसेच ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत संगणकावर घेण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.