सचिन वाझेंच्या गौप्यस्फोटानंतर अनिल परब यांची पत्रकार परिषद


मुंबई – परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. एनआयएला सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यासोबतच अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. आता खुद्द अनिल परब यांनीच या आरोपाला पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. हिंदुह्रदय सम्राच बाळासाहेब ठाकरे जे माझे दैवत आहे त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले आरोप खोटे असून हे आरोप मला बदनाम करण्यासाठीच करण्यात आले असल्याचे अनिल परब म्हणाले आहेत.

दरम्यान, अनिल परब यांनी यावेळी बोलताना आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे सांगितले. सचिन वाझेंचे आरोप आहेत की जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितले होते. मग एवढ्या दिवसांमध्ये त्यांनी यावर काहीही सांगितले नाही. परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणे गरजेचे आहे. हा एका कटाचा भाग आहे. यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग असल्यामुळे एनआयए, सीबीआय, रॉ, नार्कोटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरे जायची आपली तयारी आहे. माझी चौकशी करावी आणि चौकशीत सत्य बाहेर येईल, असे परब पत्रकार परिषदेत म्हणाले.

पहिला आरोप सचिन वाझेंनी असा केला आहे की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून मी ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केला की जानेवारी २०२१ला मी मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. त्या मी नाकारतो. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, सचिन वाझेंच्या पत्राविषयी भाजपला आधीच माहिती होते, असा आरोप यावेळी अनिल परब यांनी केला आहे. भाजपचे पदाधिकारी गेले २-३ दिवस आरडा-ओरडा करत होते की आता (संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर) आम्ही तिसरा बळी घेऊ. म्हणजे त्यांना काही दिवसांपासून या गोष्टीची कल्पना आहे. हे प्रकरण त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी तयार केले आहे. सचिन वाझे आज पत्र देणार होते, याची कल्पना बहुतेक त्यांना आधीच असल्याचा दावा अनिल परब यांनी केला.