आता पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार शिवभोजन थाळी


मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होताना दिसत असल्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शिवभोजन थाळी राज्यात पार्सल देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले आहेत. मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला कोरोना काळात शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

जनतेने सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच 5 रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.