शासकीय रुग्णालयांतील व्हेन्टिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करा, राजेश टोपे यांचे निर्देश


धुळे : जिल्हा रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांतील व्हेन्टिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करावेत. त्यासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी पुढाकार घ्यावा. ‘कोविड- 19’ रुग्णांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांना उसनवारीच्या तत्वावर तीनशे रेमडेसिव्हर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. त्यांचा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वापर करावा. तालुकास्तरावर ऑक्सिजनचे टँक कार्यान्वित करावेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी येथे दिले.

मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात धुळे जिल्ह्यातील कोविड – 19 चा प्रादुर्भाव व अनुषंगिक उपाययोजना यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री टोपे यांच्या हस्ते कुडाशी, ता. साक्री येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीसह, जिल्हा रुग्णालयातील कोविड- 19 बाह्य रुग्ण कक्ष आणि पिंपळनेर, ता. साक्री येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे ई- लोकार्पण करण्यात आले.

मंत्री टोपे म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रारंभिक लक्षणे दिसताच चाचणी केली पाहिजे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी झाली पाहिजे. त्याबरोबरच खाटांची संख्याही वाढवावी. बाधित रुग्ण कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलसह शासकीय संस्थांमध्ये अधिकाधिक संख्येने दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी गावागावांत जनजागृती अभियान राबविले पाहिजे.

कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयाने आयएमएच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच हे इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच विक्री झाले पाहिजेत. जिल्हा रुग्णालयातील व्हेन्टिलेटरसह अन्यत्र असलेले व्हेन्टिलेटर कार्यान्वित करून त्याचा दोन दिवसांत अहवाल सादर करावा. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून तालुकास्तरावर आठवडाभरात ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू नये म्हणून विभागीय आयुक्तांच्या स्तरावर पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रांसह 20 पेक्षा जास्त खाटा आणि कोल्ड चेनसह शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुविधा उपलब्ध असतील, तर ‘कोविड- 19’ लसीकरण केंद्राला मंजुरी द्यावी.

अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका कार्यकर्ती, आशा स्वयंसेविकांनी 45 वर्षांवरील नागरिकांची यादी तयार करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. या लसीकरणाचा जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमितपणे आढावा घ्यावा. आवश्यकतेनुसार लस उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी आवाहन केले. तसेच महानगरपालिकेने लवकरात लवकर विद्युतदाहिनी कार्यान्वित करावी. शासकीय रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीन व चारची पदे करार पध्दतीने भरून अहवाल सादर करावा, असेही निर्देश मंत्री टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, की धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 760 नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पॉझिटिव्हीटी दर 12.22 टक्के आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात येत आहे. सध्या चार हजार 46 रुग्ण सक्रिय असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. धुळे शहर व साक्री तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे.

तसेच फेरीवाले, दुकानदारांसह त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये पाच हजार 731 बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजनयुक्त एक हजार 70 बेड उपलब्ध असून त्यापैकी 387 बेड रिक्त आहेत. आयसीयूचे 278 बेड असून 39 रिक्त आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच लसीकरणाला सुरवात झाली असून आतापर्यंत 78 हजार 659 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंधे, महापौर सोनार, आमदार रावल, आमदार सौ. गावित, आमदार डॉ. शाह आदींनी आपले म्हणणे मांडले.