पत्रकारबांधवांना मिळणार कोरोना लस! मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा


मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात काल दिवसभरात विक्रमी 1,03,844 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आतार्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांनी एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य सरकारने नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे.

संपूर्ण देशात सध्या 45 वर्षांच्या वरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येते. सरकारी पातळीवरुन लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच दरम्यान गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे. पत्रकारांना कोरोना लस देण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत एक ट्विट करत आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे.

रविवारी उपचारादरम्यान एएनआय वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचे निधन झाले. पालकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडं ही विनंती केली आहे. दरम्यान आव्हाडांनी स्वत: ट्विट करत पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास असल्याची माहिती दिली आहे.