अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’शी संबंधित 45 जणांना कोरोनाची लागण


रविवारी (4 एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता अक्षय कुमारने आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचे सांगितलं होते. पण आता मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाशी संबंधित 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान रुग्णालयात अक्षय कुमारला दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ट्वीटद्वारे रुग्णालयात दाखल झाल्याचे अक्षयने सांगितले. त्याने ट्विटरवर लिहिले आहे की, तुमच्या प्रार्थनांचा परिणाम दिसत आहे. माझी तब्येत ठीक आहे. पण खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार मी अॅडमिट झालो आहे. लवकरच परत येईन. तुम्ही आपली काळजी घ्या.


नुकतेच मुंबईत आपला आगामी चित्रपट ‘राम सेतु’च्या चित्रीकरणाला अक्षय कुमारने सुरुवात केली होती. 5 एप्रिल रोजी मुंबईच्या मड आयलंड परिसरात एका भव्य सीक्वेन्ससाठी जवळपास 75 ज्युनियर आर्टिस्ट्स आणि इतर लोकांसह ‘राम सेतु’चं चित्रीकरण एका भव्य सेटमध्ये होणार होते. पण चित्रीकरण सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच जेव्हा सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामधील 75 पैकी 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या वृत्ताला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की, अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘राम सेतु’चे चित्रीकरण सध्या थांबवण्यात आले आहे.

अक्षय कुमारने ‘राम सेतु’चं चित्रीकरण सुरु करण्याआधी जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा अयोध्येत राम ललाच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही अक्षय कुमारने भेट घेतली होती.