मुंबई, पुण्यात कोरोनाचे तांडव! दोन्ही शहरात विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद


मुंबई : राज्यात काल कोरोनाबाधितांच्या संख्येचा विस्फोट पहायला मिळाला आहे. काल दिवसभरात तब्बल 57 हजार 074 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्याने कोरोनाची लागण होणाऱ्यांची ही संख्या एवढ्या झपाट्याने वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचेही चित्र आहे. यात मुंबई आणि पुण्यातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 11 हजार 163 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. काल मुंबईत 25 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तर पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 12 हजार 494 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली,तर 64 बाधितांचा मृत्यू झाला. ही आजपर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे. विशेष म्हणजे 30 हजार 351 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर 12 हजार 494 व्यक्ती बाधित आढळले आहेत. यावरून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणात झाला हे स्पष्ट होते.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात मुंबईतील जिम, मॉल, रेस्तरॉ बंद राहणार असून यामध्ये पार्सल सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी लागू असणाऱ्या संचाचरबंदीमध्ये आता फक्त अत्यावश्यक सेवांमध्येच कार्यरत असणाऱ्यांना वाहने चालवण्याची आणि अत्यावश्यक सेवांच्याच वाहनांपुरती परवानगी असणार आहे. यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवासाची मुभा असेल.

राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे कठोर निर्बंध नव्याने लागू करण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच राज्यातील कोरोनाबाधितांचा दिवसभरातील आकडा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केला. यामध्ये 24 तासात तब्बल 57,074 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्याने कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या एवढ्या झपाट्याने वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हे आहेत.

मागील 24 तासांत राज्यात कोरोनामुळे 222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. राज्यात सध्याच्या घडीला गृह विलगीकरणात आणि संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे आता आरोग्य सुविधा पुरवण्यावर रुग्णांना पूर्ण आणि योग्य उपचार देण्यावरच प्रशासनाचा भर असणार आहे.