राष्ट्रवादीच्या गोटातून दिलीप वळसे पाटील होणार राज्याचे नवे गृहमंत्री?


मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. तर गृहमंत्रिपदाची जबाबदारी जलसंपदा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर सोपवली जाणार असून या वृत्ताला खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

राष्ट्रवादीच्या गोटात दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधीही दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली होती. दिलीप वळसे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना अखेर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी दिलीप वळसे पाटील हे ओळखले जातात. ते दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.