अनिल देशमुख यांची राजीनाम्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव!


मुंबई – अखेर आज(सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र, या प्रकरणी आता त्यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. तसेच, १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचाही आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.

परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत.

तर, आता याप्रकरणी अनिल देशमुख हे स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समोर येत आहे. एकूणच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. विशेष, गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे नागपूरला जातील, असे वाटत होते. पण ते थेट दिल्लीला रवाना झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत ते काही मोठ्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेणार असल्याचेही बोलले जात आहे.