निसर्गाचा चमत्कार ड्रॅगन ब्लड ट्री

निसर्ग काय चमत्कार करेल हे माणसाच्या आकलनापलीकडचे आहे. यमन मधील साक्रोटा द्वीपसमूहात आढळणारा ड्रॅगन ब्लड ट्री हा वृक्ष याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. हे वृक्ष ६५० वर्षांपर्यंत जगू शकतात आणि ३३ ते ३९ फुट उंची पर्यंत वाढू शकतात. इतकेच नव्हे तर कडक हिवाळा, दुष्काळ किंवा कडक उन्हाळा अशा तापमानात ते उत्तम प्रकारे वाढतात. दिसायला हे वृक्ष जरा हटके आहेत. म्हणजे वरचा विस्तार छत्री सारखा आणि अतिशय दाट असतो.

या वृक्षाचे आगळे वैशिष्ट म्हणजे हे झाड तोडले किंवा त्याची साल काढली तर रक्तासारखा लाल द्रव त्यातून पाझरतो. त्यामुळेच याला ड्रॅगन ब्लड ट्री असे नाव पडले आहे. या वृक्षांचा पाहिला उल्लेख ईस्ट इंडिया कंपनी मधील लेफ्टनंट वेलस्टेड यांनी १८३५ च्या सर्वेक्षणात केला आहे. साक्रोटा हा भाग मुख्य जमिनीपासून दूर असून हे जंगल आहे. येथे जगात अन्यत्र आढळत नाहीत असे ३७ टक्के वृक्षांचे प्रकार दिसतात.

ड्रॅगन ब्लड ट्री हा वृक्ष आर्थिक दृष्ट्याही महत्वाचा आहे. पशु आहार म्हणून तो उपयुक्त आहे. त्याची फळे गाई बकऱ्या यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यातून पाझरणारा लाल द्रव म्हणजे रेझिनचा प्रकार आहे. साध्या तापापासून ते अल्सर पर्यंत अनेक रोगात त्याचा औषधी वापर केला जातो. लाल रंगाच्या द्रवामुळे यात जादुई शक्ती असल्याचे मानले जाते. त्यामुळे जादू टोणा, मंत्र तंत्रात, निगेटिव्ह एनर्जी घालविण्यासाठी याचा वापर केला जातो. मात्र जलवायू परिवर्तनाचा परिणाम या वृक्षांवर होत असून नवे वृक्ष आकाराने खुपच बदललेले दिसतात. २०८० पर्यंत यातील ४५ टक्के वृक्ष नाहीसे होतील अशी भीती वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.