राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉनचे आयोजन


मुंबई : शासकीय विभागात येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन उपक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रथमच राबविला जाणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नागरिक यात सहभागी होण्यास पात्र असतील. विविध क्षेत्रातील अनुभवी, व्यावसायिक, शैक्षणिक तज्ञ आणि कौशल्यप्रधान असलेले सर्व नागरिक अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२१ आहे.

हॅकॅथॉन हा एक असा उपक्रम आहे ज्यात विशिष्ट समस्यांवर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा एक संघ बनवून मर्यादित कालावधीत नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना शोधण्यात येतात. आरोग्य विभागातील विविध वैविध्यपूर्ण दृष्टिकोनातून व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उपाययोजना शोधण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग केला जाऊ शकतो. या उपक्रमात सहभागासाठी प्रभावशाली उपाययोजनेकरीता अर्जदारांची वचनबद्धता आणि सहयोग करण्याची तयारी सर्वात महत्त्वाचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक नाही. इंजिनियरिंग, औषध क्षेत्र, डिझाइन, जीवन विज्ञान, व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रातील समस्या सोडवणाऱ्यांनी यात विशेषत: सहभाग घ्यावा. नवउद्योजक, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार, उद्योजक आणि राज्य सरकार यांच्यासाठी एक सहयोगात्मक व्यासपीठ बनविणे तसेच तरुणांमध्ये नाविन्यपूर्ण विचारसरणी निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

प्रत्येक ट्रॅकमधील सर्वोत्कृष्ट कल्पनांना पुरावा संकल्पना विकसित करण्यासाठी मार्गदर्शन, प्री-इनक्युबेशन ऑफर, गुंतवणूकदारांपुढे सादरीकरणाची संधी, ५ हजार डॉलरपर्यंत क्लाऊड क्रेडिट असे विविध फायदे मिळणार आहेत. ट्रॅक अ मध्ये लसीकरण (Vaccination & Immunization), ट्रॅक ब मध्ये परवडणाऱ्या दरात रोगनिदानाची उपकरणे (Affordable Diagnostic Tools), ट्रॅक क मध्ये प्रतिसादात्मक अत्यावश्यक सेवा (Responsive Emergency Services), ट्रॅक ड मध्ये नवजात बालकांची काळजी सुधारण्यासाठी वैद्यकीय उपकरणे (Medical Devices Improving Neonatal Care) असे हॅकॅथॉन ट्रॅक्स आहेत.

२३ एप्रिल २०२१, शुक्रवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता की नोटस् सत्र, हॅकिंग मेडिसिनची प्रस्तावना तर रात्री ८ वाजता समस्या सादरीकरण, २४ एप्रिल २०२१, शनिवार रोजी सकाळी ९ वाजता मार्गदर्शन सत्र, सकाळी १० वाजता कार्यसंघ नोंदणी तर सायंकाळी ७ वाजता सादरीकरणाचा सराव होईल. २५ एप्रिल २०२१, रविवार रोजी सकाळी १० वाजता अंतिम सादरीकरण, सकाळी ११ वाजता अंतिम सादरीकरणाचा परिक्षकांद्वारे आढावा तर दुपारी २ वाजता पुरस्कार आणि बक्षीसे वितरण होईल.

अधिक माहितीसाठी https://www.msins.in/public/maharashtra-health-hackathon या लिंकवर क्लिक करावे.