लॉकडाऊनसंर्भात राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; होणार मोठा निर्णय


मुंबई – कोरोनाचे राज्यावर ओढावलेले संकट दिवसेंदिवस अजूनच गहिरे होत आहे, त्यातच कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येचा विस्फोट यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत लॉकडाउनसंदर्भातील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाउन करायचा की कडक निर्बंध लावायचे यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उपद्रव झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील स्थितीही चिंताजनक असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाउन लावू असा इशारा दिला होता. तसेच दोन दिवसात निर्णय घेऊ असे ठाकरे म्हणाले होते. आज या सर्व पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लॉकडाउन संदर्भातील निर्णय होणार असल्याची दाट शक्यता आहे. या बैठकीनंतर त्याची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.