काल दिवसभरात राज्यात 4,62,735 जणांचे विक्रमी लसीकरण


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. राज्यात काल दिवसभरात जवळपास 50 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाल्यामुळे कोरोना संदर्भातील नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण करुन घेणे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या जशी वाढत आहे तसा लसीकरणाचाही वेग वाढत आहे. 4 लाख 62 हजार 735 जणांचं विक्रमी लसीकरण काल दिवसभरात करण्यात आले आहे.

काल झालेल्या लसीकरणापैकी 4 लाख 31 हजार 458 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड आणि 31 हजार 277 जणांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले. काल एकूण 4102 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. आतापर्यंत राज्यात एकूण 73 लाख 47 हजार 429 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने राज्यात वेग घेतला असून काल 3 एप्रिल रोजी एकाच दिवसात 4 लाख 62 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एकाच दिवसात एवढ्या उच्चांकी संख्येने लसीकरण करण्याची देशातील ही पहिलीच वेळ असून त्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला गेला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले.

राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 37821 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. एकूण 2495315 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.