इजिप्तची राणी, सौंदर्यवती क्लीयोपात्रा

egypt
क्लीयोपात्रा (सातवी) फिलोपेटर हिला तिच्या संपूर्ण नावाने ओळखले न जाता केवळ क्लीयोपात्रा या नावाने ओळखले जात असे. जगभरामध्ये जिच्या सौंदर्याची चर्चा होती, अशी ही क्लीयोपात्रा इजिप्तची सम्राज्ञी होती. म्हणूनच आजच्या काळामध्येही सौंदर्याची परिसीमा म्हणून क्लीयोपात्राचा उल्लेख केला जातो. तत्कालीन मातब्बर रोमन राज्यकर्ते ज्युलियस सीझर आणि मार्क अँटनी यांना भुरळ घालणारी ही सौंदर्यवती खरेच किती मनमोहक होती याचे अनेक उल्लेख इतिहासकारांच्या आणि तत्वाज्ञांच्या लिखाणातून सापडतात.
egypt1
इजिप्तवर सुमारे तीनशे वर्षे शासन केलेल्या ‘टोलेमी’ वंशाची, क्लीयोपात्रा राजकन्या असून, इजिप्तवरील टोलेमिक अधिपत्याची ती शेवटची सम्राज्ञी होती. तिच्या अधिपात्याखाली असलेल्या राज्याचा विस्तार इजिप्त, सायप्रस, मध्यपूर्वेकडील काही भाग आणि लिबिया देशाचा काही प्रांत इथवर होता. क्लीयोपात्राची मातृभाषा ‘कोईने ग्रीक’ असूनही तिने सत्ता हाती घेतल्यानंतर इजिप्शियन भाषा ही शिकून घेतली होती. क्लीयोपात्राने इजिप्तची सत्ता हाती घेतल्यानंतर तिने रोमशी राजकीय संबंध प्रस्थापित केले. या राजकीय संबंधाच्या बरोबरच रोमचा सम्राट होण्याची इच्छा मनामध्ये बाळगून असलेल्या ज्युलियस सीझरसोबत तिचे प्रेमसंबंधही जुळले. पण या संबंधांच्या मागे ही क्लीयोपात्राचा स्वार्थ होता. इजिप्तमध्ये त्याकाळी पेटत असलेल्या नागरी युद्धामध्ये स्वतःचे वर्चस्व राहावे यासाठी रोमन सैन्याच्या मदतीची आवश्यकता क्लीयोपात्राला होती. म्हणूनच तिने रोमशी राजकीय आणि रोमन राजनेत्याशी वैयक्तिक पातळीवर संधान जुळविले होते. क्लीयोपात्राशी संधान जुळविण्यात ज्युलियस सीझरचा ही स्वार्थ होताच. ज्याप्रमाणे क्लीयोपात्राला आपली सत्ता अबाधित राहण्यासाठी रोमन सैन्याच्या मदतीची आवश्यकता होती, त्याचप्रमाणे ज्युलियस सीझरला रोमची सत्ता स्वतःच्या हातात येण्यासाठी क्लीयोपात्राच्या अमाप संपत्तीची आवश्यकता होती. ख्रिस्तपूर्व ४४ साली जेव्हा ज्युलियस सीझरचे निधन झाले, तेव्हा त्याचा मानसपुत्र मार्क अँटनी याच्याशी क्लीयोपात्राने, स्वतःचा पुनश्च स्वार्थ साधत संधान जुळविले होते.
egypt2
दुसऱ्या शताब्दीतील ग्रीक इतिहासकार डीयोच्या मते क्लीयोपात्रा तरुणपणी अतिशय सुंदर दिसत असे. तिचा आवाज अतिशय मधुर असून समोरच्या व्यक्तीवर स्वतःची अनुकूल छाप पाडण्याची कला क्लीयोपात्राला साध्य होती. आणि म्हणूनच तिच्यापेक्षा वयाने पुष्कळ मोठा असलेल्या ज्युलियस सीझरला देखील तिने सहजपणे वश करून घेतले होते. तिला पाहता क्षणीच कोणत्याही पुरुषाचे मन भाळावे इतकी ती रूपसुंदर असल्याचे डीयोने म्हटले आहे. ४६-१२० सालाच्या दरम्यान प्लूटार्क नामक एका तत्वज्ञाने देखील क्लीयोपात्राच्या सौंदर्याचे वर्णन केलेले आहे. केवळ तिचे रूपच नव्हे, तर तिच्या वागण्या-बोलण्याची पद्धतही अतिशय आकर्षक असल्याचे हा तत्वज्ञ म्हणतो. क्लीयोपात्रा ही दिसण्यास कशी होती याची नेमकी माहिती मिळणे अवघड असले तरी इतिहासकारांनी केलेली तिची वर्णने, अस्तित्वात असलेली तिची चित्रे, पुतळे इत्यादी वस्तूंवरून क्लीयोपात्रा खरेच सौंदर्यवती असावी असे म्हणता येऊ शकते. तिच्याकडे केवळ रूपाचे सौंदर्य नव्हते, तर ती अतिशय बुद्धिमान आणि चतुरही असल्याने कोणालाही सहज भुरळ पडेल असे तिचे व्यक्तिमत्व होते.

Leave a Comment