हा आहे जगातील सर्वाधिक वयाचा प्राणी

animal
मूळच्या सेशेल्स येथील विशालकाय कासवाच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नवा विक्रम नोंदविण्यात आला असून, जगातील सर्वाधिक वयाचा, स्वतःच्या पायांवर चालू शकणारा प्राणी असल्याचा विक्रम या कासवाच्या नावे झाला आहे. या कासवाचे नाव जोनाथन असून, जोनाथनने या वर्षी वयाची १८७ वर्षे पार केली आहेत. जोनाथनचे आताचे वय लक्षात घेता त्याचा जन्म १८३२ च्या सुमाराला झाला असावा. म्हणजेच ज्या काळी टेलिफोन आणि फोटोग्राफीच्या कल्पनाही अस्तित्वात नव्हत्या, त्या काळचा जोनाथनचा जन्म आहे.
animal1
आफ्रिकेतील सेशेल्स या लहानशा बेटावर जन्मलेल्या जोनाथनला १८८२ साली दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये असलेल्या सेंट हेलेना या बेटावर हलविण्यात आले होते, त्यावेळी त्याचे वय पन्नास वर्षांचे होते. त्या काळी या बेटाच्या गव्हर्नरांना भेट म्हणून जोनाथनला या बेटावर आणण्यात आले होते. या बेटावर आल्यानंतर जोनाथन इतर अनेक कासवांच्या सोबतीने राहू लागला. मात्र त्याच्या योग्य मादी कासव येथे नसल्याने जोनाथनची पिल्ले मात्र अद्याप आलेली नाहीत.
animal2
या कासावांमध्ये ज्या मादी आहेत, त्या कासावांच्या भिन्न प्रजातीच्या असून जोनाथन त्या प्रजातीचे कासव नाही. जोनाथनच्याच प्रजातीचे आणखी एक कासव येथे असून या कासवाचे नाव डेव्हिड आहे. डेव्हिड मात्र जोनाथन पेक्षा वयाने पुष्कळ लहान असून, त्याचे वय सध्या ऐंशी वर्षांचे आहे. जोनाथन ‘सेशेल्स जायंट’ या प्रजातीचा असून, या प्रजातीच्या कासवांचे सरासरी आयुष्यमान साधारण दीडशे वर्षे असते. मात्र जोनाथन ने ही आयुर्मर्यादा केव्हाच मागे टाकली असून सध्या पृथ्वीवरील स्वतःच्या पायाने चालणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये सर्वाधिक वय असल्याचा मान जोनाथनला मिळाला आहे. या पूर्वी हा विक्रम , १८८ वर्षांच्या ‘तुई मालीला’ नामक मॅडगास्कर येथे जन्मलेल्या कासवाच्या नावे होता. या कासवाचा जन्म १७७७ साली झाला असून, हे कासव १९६५ सालापर्यंत जगले.

Leave a Comment