अचानक ओढविलेल्या नैसर्गिक आपदेमुळे रोममध्ये एके काळी अतिशय संपन्न असलेले संपूर्ण पॉम्पेई शहर जमिनीच्या उदरामध्ये गडप झाले होते. त्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी पुरातत्ववेत्त्यांनी उत्खनन सुरु केले, तेव्हा त्यांच्यासमोर प्रकट होत गेलेल्या पॉम्पेई शहराने या तज्ञांनाही स्तिमित केले होते. ७९ सालामध्ये माउंट व्हेसुवियसचा उद्रेक झाल्याने त्यातून उसळलेल्या राखेखाली हे संपूर्ण शहर गडप झाले होते. मात्र आता सुमारे दोन हजार वर्षांच्या नंतर जसजसे उत्खनन होत आहे, तसतशी या शहराची रचना समोर येत आहे. त्या ठिकाणी सापडल्या असणाऱ्या भग्न वास्तू, मूर्ती, हत्यारे, अवजारे, आभूषणे, भांडीकुंडी हे सर्व पाहून तिथे राहणाऱ्या लोकांची तत्कालीन जीवनशैली कशी असावी या संदर्भात सातत्याने नवे खुलासे होत आहेत.
अलीकडच्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये पॉम्पेई येथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये एक ‘थर्मोपोलियम’ सापडले असून, यामध्ये एका ओट्यावर अनेक मोठे मातीचे हंडे ठेवलेले आढळले आहेत. एखाद्या फास्ट फूड काऊंटर प्रमाणे हे थर्मोपोलियम दिसत आहे. त्याकाळी रोमन संस्कृतीमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांवर अशा प्रकारची थर्मोपोलियम प्रचलित असून, रोमन ‘स्ट्रीट फूड’ चाखण्यासाठी येथे लोक नेहमीच गर्दी करीत असत. ‘थर्मोपोलियम’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘गरमागरम खाद्यपदार्थ मिळण्याचे ठिकाण’ असा असल्याने येथे नेहमीच खवैय्यांची गर्दी होत असे. सर्वांना सहज परवडेल असे स्वस्त आणि ताजे, गरम अन्न मिळण्याचे हे ठिकाण होते.
‘द गार्डियन’ ने दिलेल्या वृत्तानुसार प्राचीन पॉम्पेईमध्ये सुमारे दीडशे थर्मोपोलियम असावेत असा पुरातत्ववेत्त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे त्या काळी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसलेल्या लोकांनाही थोड्याश्या मोबदल्यात पोटभर ताजे अन्न मिळण्याची सोय या शहरामध्ये असल्याचे तज्ञ म्हणतात. पुरातात्वेत्त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार त्या काळी या थर्मोपोलियममध्ये ब्रेड, खारावलेले मासे, भट्टीत भाजलेले चीज, डाळी, आणि मद्य अशा प्रकारचे खाद्यपदार्थ, तत्कालीन ‘फास्ट फूड बार्स’मध्ये उपलब्ध असे. काऊंटरवर मांडण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांनी भरलेल्या मोठमोठ्या मातीच्या भांड्यांना ‘डोलिया’ म्हटले जात असे. या ‘डोलिया’मध्ये अन्नपदार्थ साठविले जात असत. तसेच काऊंटरवर ही सुंदर चित्रकाम केलेले आढळून आले आहे. थर्मोपोलियम हे स्वस्त आणि ताजे अन्न मिळण्याच्या ठिकाणाबरोबरच मित्रमंडळींना भेटण्याचे, कामानिमित्त लोकांना भेटण्याचे ठिकाण म्हणूनही प्रचलित होते.