महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यावरुन केंद्र सरकारला नाना पटोले यांनी सुनावले खडेबोल


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, कोरोना रुग्णांची संख्या शहरी भागासह ग्रामीण भागातही प्रचंड वेगाने वाढत आहे. २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. हे तरुण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडतात, त्यामुळे कोरोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली, त्याचबरोबर महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यावरुन केंद्र सरकारला नाना पटोले यांनी खडेबोल सुनावले.

राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबवली जात आहे. ४५ वर्षांवरील लोकांना १ एप्रिलपासून लस देण्यास सुरुवात केली, ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांना कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घ्यावी.

कोरोनाचे बदललेले रुप घातक असून, प्रादुर्भावाचा वेगही अधिक आहे. कोरोनाबाधितांची संख्या फेब्रुवारीपासून वाढू लागली, तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती असल्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणे गरजेचे आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली, तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे सोपे होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही, हे दुर्दैवी आहे. कोरोनाबाधितांची संख्या ज्या झपाट्याने वाढत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले गेले पाहिजे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

कोरोना लसीची महाराष्ट्राला नितांत गरज असताना केंद्र सरकार अत्यल्प लसींचा पुरवठा करत आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचे काम करत आहे. देशात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात जास्त असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करत जनतेनेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही पटोले यांनी केले.

महामारी काही देशात पहिल्यांदाच आलेली नाही. महामारींचा सामना काँग्रेसचे सरकार असताना करावा लागला होता. तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यासाठी योग्य नियोजन करुन त्यावर यशस्वी मात केली. पोलिओ लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवल्याने त्यावर मात करण्यात यश आले. जर पोलिओवर मात करु शकलो तर कोरोनावर मात करणेही शक्य आहे. केंद्र सरकारने दृढ निश्चय करुन सार्वत्रिकरित्या मोठ्या प्रमाणात तसेच सरसकट कोरोना लसीकरणाची मोहीम राबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केल्यास कोरोनाच्या महामारीवरही नक्कीच मात करता येईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.