घरात दोन कोरोनाबाधित रुग्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?


मुंबई – बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या सोहळ्याला उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही कार्यक्रम पत्रिकेत नाव होते. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे ते अनुपस्थित होते. दरम्यान घरात दोन कोरोनाबाधित रुग्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला अशी विचारणा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचे मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांवरील बोजा कमी करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महापौरांच्या याच वक्तव्यावरुन अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

ट्विट करत अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा.

दरम्यान आदित्य ठाकरे यांच्यासहित त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली असून विलगीकरणात असताना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.