नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांसह आसाममध्ये विधानसभा निवडणूक पार पडत आहेत. याच दरम्यान काल विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले आहेत. या प्रकरणावरून मोठा गदारोळ उडाला आहे. या घटनेत विशेष म्हणजे ईव्हीएम मशीन ज्या गाडीत सापडले, ती गाडी भाजप उमेदवाराची असल्याचे समोर आले आहे. विरोधकांनी याप्रकरणी भाजपवर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
आसाम; भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळले ईव्हीएम, निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी
गुरुवारी आसाम विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. सोशल मीडियावर मतदानानंतर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत एका गाडीत ईव्हीएम मशीन सापडले असून हे ईव्हीएम मशीन ज्या गाडीमध्ये सापडले, ती कार भाजप उमेदवाराची असल्याचे समोर आले आहे. या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. सोशल मीडियावर ज्या कारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती कार भाजप उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
Breaking : Situation tense after EVMs found in Patharkandi BJP candidate Krishnendu Paul’s car. pic.twitter.com/qeo7G434Eb
— atanu bhuyan (@atanubhuyan) April 1, 2021
या घटनेची तक्रार लोकांनी केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कडाडून टीका केली आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीन खासगी गाडीत सापडल्यानंतर अनेक गोष्टी सारख्याच असतात. पहिले म्हणजे सर्वसाधारणपणे गाडी भाजप उमेदवारांची अथवा त्यांच्या सहकाऱ्यांची असते. घटनेच्या स्वरूपात या प्रकारच्या व्हिडीओंना स्वीकारले जाते आणि नंतर फेटाळून लावले जाते.
त्याचबरोबर आपल्या माध्यमांचा वापर करून ज्या लोकांनी अशा प्रकारच्या घटना उघडकीस आणल्या त्यांच्यावर भाजप आरोप करते. निवडणूक आयोगाने तक्रारींवर कारवाई करण्याची तसेच सर्व पक्षाकडून ईव्हीएम मशीनची पुर्नतपासणी करणे आवश्यक असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.