कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेस एक महिन्यासाठी रद्द


मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पण तरीही राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येचा वेग थांबायचे नाव घेताना दिसत नाही. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद ते मुंबई धावणारी तेजस एक्सप्रेस एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे. आजपासून (2 एप्रिल) एक महिन्यासाठी आईआरसीटीसीतर्फे चालवण्यात येणारी 82902/82901 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद राज्यात काल करण्यात आली आहे. काल 32 हजार 641 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 24,33,368 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.2% एवढे झाले आहे. राज्यात आज 249 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.92% एवढा आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात राज्यात काल सर्वाधिक 2410 कोरोनाबाधितांची नोंद झाली. गुजरात राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 10 हजार 108 वर गेला आहे. अहमदाबादमध्ये काल 626 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.