आज दिवसभरात मुंबईत ८ हजार ६४६ कोरोनाबाधितांची नोंद, तर १८ जणांचा मृत्यू


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वेगाने होत असून दररोज मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. मुंबईत लॉकडाउनचा देखील इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर एका वृत्तावाहिनीशी बोलताना दिला आहे. दरम्यान, आज दिवसभरात मुंबईत ८ हजार ६४६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

तसेच मुंबईत मागील २४ तासांत ५ हजार ३१ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. आजपर्यंत ३ लाख ५५ हजार ६९१ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबईत ५५ हजार ५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ११ हजार ७०४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून वाढू लागली आहे. मुंबईतील कोरोनावाढीचा दर सरासरी १.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत सरकारी, पालिका आणि खासगी रुग्णालयांत खाटांची मोठय़ा प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना शोधण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटातील संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. लक्षणे नसलेले, मात्र बाधा झालेले रुग्ण, अतिजोखमीच्या गटातील संशयित रुग्णांना पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात किंवा अटीसापेक्ष गृह विलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात येत आहे.

पण गृह विलगीकरण धोक्याचे ठरू लागले आहे. घरामध्ये स्वतंत्र खोली, त्यात प्रसाधनगृह असेल तरच रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याची मुभा दिली जात आहे. अशा रुग्णांनी कुटुंबातील अन्य सदस्यांपासून दूर राहणे अपेक्षित आहे. पण ही काळजी रुग्णांकडून घेतली जात नसल्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले.

गृह विलगीकरणात लक्षणे नसलेले, मात्र बाधित झालेले, सौम्य लक्षणे असलेले, तसेच अतिजोखमीच्या गटातील संशयित रुग्णांना अटीसापेक्ष राहण्याची मुभा देण्यात आली असून आजघडीला तब्बल चार लाख १५ हजार २२९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. पण नियमांचे काटेकोरपणे पालन या रुग्णांकडून होत नसल्याने गृह विलगीकरण धोक्याचे ठरू लागले असून एका सदस्यामुळे संपूर्ण कुटुंबच बाधित होत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे ही नवी समस्या यंत्रणांसमोर ठाकली आहे.