कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू, आहे तो बंद करा – संजय निरुपम


मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजून गहिरे होत असल्यामुळे राज्य सरकार आता निर्बंध अधिकच कडक करत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ आज (गुरूवार) स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी लॉकडाउन आणि सरकारी निर्बंधांविरोधात निदर्शने केली. काँग्रेस नेते संजय निरूपम हे देखील या हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी यावेळी उपस्थित होते. यावेळी निरूपम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

माध्यमांशी बोलताना यावेळी संजय निरूपम म्हणाले, मुद्दा केवळ एवढाच आहे की कोरोनाशी आपल्याला लढायचे आहे आणि हे कुणीच नाकारत नाही, पण लढण्यासाठी जगणे महत्वाचे आहे. विविध निर्बंध आणून ज्या प्रकारे लोकांचा धंदा बंद केला जात आहे, त्यामुळे बेरोजगारी पुन्हा एकदा वाढेल. व्यवसाय बंद पडतील व संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. लोकांसमोर भूखबळीचे संकट निर्माण होईल.

तसेच, मागील लॉकडाउनमुळे जनता एवढी उद्धवस्त झाली आहे की, अद्यापपर्यंत स्थिरावलेली नाही. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली, जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही. काही सावधानता बाळगण्यासाठी हॉटेलवाले देखील तयार आहेत, मुंबईचे सर्वसामान्य नागरीक देखील तयार आहेत. त्या दक्षतेची व्याख्या करा, त्या समजवा हॉटेल, रेस्टॉरंट व उर्वरीत व्यवसाय कसे चालतील? याची काळजी सरकारने करायला हवी. कारण, जो लॉकडाउन मागच्यावेळी झाला, त्यानंतर मोठ्याप्रमाणात मुंबईहून स्थलांतरित मजुरांना मिळेल त्या मार्गाने व साधनाचा वापर करून परतावे लागले. तर आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकांना बेराजगार होऊन गावी जावे लागू शकते. ही परिस्थिती मुंबईसाठी व मुंबईच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली ठरणार नसल्याचे निरूपम यांनी यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर मी काँग्रेसच्यवतीने मागणी करतो की, आमचे म्हणणे सरकारने ऐकावे सर्वसामान्य नागरिक, उद्योजकांच्या अडचणी त्यांनी ऐकाव्यात आणि जेवढे लवकर होईल तेवढे लॉकडाउनची धमकी देण्याऐवजी काही दक्षता बाळगण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनांबरोबर सर्वांना सोबत आयुष्य जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी देखील निरूपम यांनी केली.

निरूपम नाईट कर्फ्यूच्या मुद्यावर बोलताना म्हणाले, मला नाही माहिती की कोरोनाचा जो विषाणू आहे, तो रात्री जास्त वेगाने कार्यरत असतो, की दिवसा?. रात्री ८ ते ११ हॉटेल बंद असणे म्हणजे हॉटेलचा धंदा संपूर्णपणे नष्ट करणे. बिअर बार, पब इत्यादी ज्या काही बाबी असतील त्या तुम्ही बंद करा, पण सामान्य जी काही हॉटेल्स आहेत त्यांचा व्यवसाय ८ ते ११ या वेळेतच होत असतो, तीच त्यांच्या धंद्याची वेळ असते. त्याला देखील तुम्ही नाईट कर्फ्यूच्या नावाखाली बंद करत आहात, हा उघडपणे अन्याय आहे.