एक वर्षभरच राहणार करोना लसीचा प्रभाव

जगभरातील बहुतेक सर्व देशांमध्ये कोविड १९ लसीकरण वेगाने सुरु असतानाच एक मोठी बातमी आली आहे. जगभरातील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार करोना विषाणू वारंवार रूप बदलतो आहे म्हणजे म्युटेट होतो आहे त्यामुळे सध्या दिल्या जात असलेल्या लसीचा परिणाम वर्षापेक्षा अधिक काळ राहणार नाही.

म्युटेशन पीपल्स वॅक्सिन अलायंस ने २८ देशातील ७७ वैज्ञानिक, विषाणूतज्ञ, साथ रोग तज्ञ, संक्रामक रोग तज्ञ याची या संदर्भात मते घेऊन तसा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यतील २/३ तज्ञांनी या लसीचा प्रभाव १ वर्षापेक्षा सुद्धा कमी काळ टिकेल असे मत व्यक्त केले आहे. मंगळवारी सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिध्द केला गेला आहे.

मुळात कोविड १९ लसीकरणाचा वेग सगळीकडे सारखा नाही. गरीब देशांना ही लस मिळून लसीकरण होण्यास बराच वेळ लागणार आहे. गरीब देशात पुढच्या वर्षात फक्त १० टक्के लसीकरण होऊ शकेल असे दिसते आहे. प्रोफेसर देवी श्रीधर यांच्या मते या विषाणूचा फैलाव जितका अधिक होईल तितकी विषाणूचे म्युटेशन होण्याची शक्यता वाढते. अश्या परिस्थितीत सध्याची लस नवीन म्युटेट झालेल्या विषाणूवर परिणामकारक ठरू शकत नाही.