Videoः सुएझ कालवा सोडताना त्या जहाजाने वाजवला ‘धूम मचा ले’ हॉर्न


नवी दिल्ली – इजिप्तमधील सुएझ कालव्यात जवळपास एका आठवड्यापर्यंत अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन जहाज अखेर बाहेर काढण्यात आले आहे. सुएझ कालव्याचा मार्ग हे जहाज अडकल्यामुळे इतर जहाजांसाठी बंद झाला होता, त्यामुळे युरोप आणि आशियातील व्यापार जवळपास ठप्प झाला होता. हे जहाज आता पुन्हा पाण्यावर तरंगायला लागल्यानंतर याच जहाजाचा एका नवीन व्हिडिओने नेटकऱ्यांना आकर्षित केले आहे.


एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यानुसार महाकाय एव्हर गिव्हन जहाजाच्या हॉर्नला बॉलिवूडचा गाजलेला चित्रपट ‘धूम’ची म्यूझिक देण्यात आली आहे. ‘धूम’मधील गाण्याचे म्यूझिक एव्हरग्रीन कंपनीच्या एव्हर गिव्हन जहाजाच्या हॉर्नला दिल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे. पण या व्हिडिओची अद्याप पुष्टी झालेली नाही, परंतु हा व्हिडिओ खरा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण, सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हन या महाकाय मालवाहू जहाजावरील बहुतांश कर्मचारी हे भारतीयच होते.

हा व्हिडिओ सुएझ कालवा सोडताना धूम हॉर्न वाजवण्यात आला आणि १०० टक्के भारतीय कर्मचारी, अशा कॅप्शनसह सध्या प्रचंड शेअर होत आहे. हा व्हिडिओ धूम चित्रपटाचे पटकथा लेखक मयूर पुरी यांनीही शेअर करताना वाह! धूम मचा ले, असे म्हटले आहे. त्याचबरोबर अभिनेता उदय चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम यांनाही त्यांनी टॅग केले आहे.