शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी


मुंबई : मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते रुग्णालयात 31तारखेला दाखल होणे अपेक्षित होते. पण, दुखणे अधिक जाणवू लागल्यामुळे त्यांना एक दिवस आधीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यानंतर त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रियाही करण्यात आली.

शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या चमूचे आभारही मानले. तर, शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे आरोग्य मंत्री यांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्याबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील. पण, तूर्तास मात्र शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच विविध स्तरांतून त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात असल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, श्री शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.