करोना ग्रस्त भारतीय मुष्टीयोद्धा टीम मायदेशी परतली

इंस्तम्बुल मध्ये करोना मुळे विलगीकरणात ठेवल्या गेलेल्या भारतीय मुष्टीदलातील आठ जणांपैकी सात जण बुधवारी मायदेशी परतले आहेत. मात्र कोच धर्मेंद्र यादव यांची करोना टेस्ट दुसऱ्यावेळीही पोझिटिव्ह आल्याने त्यांना अद्याप मायदेशी परतता आलेले नाही. तुर्कस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय मुष्टीदलातील आठ सदस्यांना कोविड १९ ची लागण झाली होती त्यात तीन मुष्टियोद्धे सुद्धा सामील होते.

हे दल बोरफोरस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुर्कस्तानला गेले होते. या स्पर्धेचे यजमानपद तुर्कस्तानकडे होते. स्पर्धा संपल्यावर या दलातील सर्वाना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत दिसून आले. त्यात राष्ट्रमंडळ खेळातील रजत पदक विजेता गौरव सोलंकी, प्रयाग चौहान आणि बृजेश यादव या तीन मुष्टीयोद्यांचा समावेश होता. त्यामुळे या सर्वाना स्पर्धा संपल्यावरही इंस्तम्बुल मध्ये विलगीकरणात ठेवले गेले होते. त्यातील सात जणांचा रिपोर्ट आता निगेटीव्ह आल्याने त्यांना मायदेशी परतण्यास परवानगी दिली गेली होती. या स्पर्धेत पुरुष खेळाडू गौरव सोलंकी याने कांस्य पदकाची कमाई केली आहे.