अभिनेता एजाज खानला एनसीबीने केली अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजे एनसीबीने अभिनेता एजाज खान याला आठ तास करून चौकशी केल्यावर अटक केली असल्याचे समजते. एजाज राजस्थान मधून मुंबईत पोहोचताच त्याला एनसीबीने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक करून केलेल्या चौकशीत एजाजचे नाव पुढे आले होते. एजाज बटाटा गँगचा हिस्सा असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान एनसीबीने मंगळवारी अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स सह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. काही दिवसापूर्वी शादाब बटाटा याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त केले गेले होते. बटाटा गँगचा म्होरक्या फारूक बटाटा पूर्वी बटाटे विकत असे. अंडरवर्ल्डशी संपर्कात आल्यापासून तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर बनला आहे. त्याचा व्यवसाय मुलगा शादाब पाहतो.

एजाज खान नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. भडकाऊ पोस्ट शेअर करणे प्रकरणी त्याला तुरुंगवास झाला होता. फेसबुक लाईव्ह मध्ये त्याने वादग्रस्त विधाने केल्याने त्याच्या अटकेची मागणी केली जात होती. मुंबई खार पोलिसांनी त्याच्यावर मानहानीची केस दाखल केली आहे. टीव्ही वरील बिग बॉस मध्ये प्रतिस्पर्ध्याला मारहाण केल्यापासून तो पुन्हा चर्चेत आला होता.