मनसेचा संभाव्य लॉकडाऊनला विरोध


मुंबई: राज्यावर पुन्हा एकदा ओढावलेल्या कोरोना संकटामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यावर संभाव्य उपाय म्हणून लॉकडाऊनला विरोध केला आहे. या संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होते, असे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले नाही आणि जर तसे काही असेल तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगावे.

गेल्या वर्षीही लॉकडाऊन करण्यात आला होता. राज्य सरकार आणि सर्वसामान्यांना त्यावेळेस या संदर्भात कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. पण गेल्या वर्षभरात कोरोनावर कोणते वैद्यकीय उपचार करावे लागतात, त्याच्यासाठी लागणारी संसाधने उपलब्ध आहेत, लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का? असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.

हॉटेल्स आणि बार रात्री 8 वाजेनंतर बंद करण्यात आले आहेत. हप्ते मिळत नसल्याने हे बंद करण्यात आले आहेत का? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकांना बेजबाबदार म्हणून प्रसार माध्यमांनीही कोरोनाची भीती घालू नये, असा सल्लाही देशपांडे यांनी दिला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनला राज्यात विरोध वाढत आहे. औरंगाबाद शहरातही लॉकडाऊनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. तसेच तेथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही लॉकडाऊनला विरोध करत तसे झाल्यास अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. राज्यातील जनतेला लॉकडाऊन आता परवडणार नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबद्दल आपण भूमिका मांडली असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था मजबूत केली पाहिजे, अशी भूमिका मलिक यांनी मांडली आहे.

दुसरीकडे, आपला लॉकडाऊनला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट करत कोरोनासाठी चाचण्या वाढवा, काळजी घ्या पण आता लोकांनी घरी बसावे ही भूमिका योग्य नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही म्हटले आहे. या सगळ्या प्रतिक्रियांची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण टाळेबंदीऐवजी सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिस्थितीनुसार कठोर निर्बंधांवर भर देण्याचे संकेत दिले आहेत.