भारतीय महिला संघाच्या कर्णधाराला कोरोनाची लागण


मुंबई : कोरोनाने भारतीय संघातील दिग्गज क्रिकेटपटूंना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली असून सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, यूसूफ पठाण आणि एस. बद्रीनाथ या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हरमनप्रीतला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर ती टी-20 मालिका खेळू शकली नव्हती. सोमवारी झालेल्या चाचणीमध्ये हरमनप्रीतची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

मागील चार दिवसांपासून हरमनप्रीत आजारी होती. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येताच तिने स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. तिच्यावर योग्य उपचार सुरु असून ती लवकरच पूर्णपणे बरी होईल, अशी माहिती तिच्या जवळच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या दरम्यान हरमनप्रीत कौरची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही मालिका संपल्यानंतरच तिला कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दक्षिण आफ्रिके विरोधातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत भारताचा पराभव झाला. पण या मालिकेत हरमनप्रीतने एक अर्धशतक झळकावले होते.