पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका – संजय निरुपम


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा विचार ठाकरे सरकार करत असल्याची चर्चा सुरु आहे. पण लॉकडाऊनला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर विरोध केला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन पर्याय नसल्याचे आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक उद्योजकांनीही सांगितले आहे. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील लॉकडाऊनवरुन संताप व्यक्त केला आहे.

राज्य सरकारचे चुकीचे नियोजन असून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे. कारण जो लॉकडाऊन गेल्या वर्षी लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे संजय निरुपम म्हणाले आहेत.

लॉकडाऊनमुळे सव्वा तीन कोटी लोक गरीब झाल्याचा एक रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका, असे सांगतानाच संजय निरुपम यांनी निर्बंध लावण्याला समर्थन दर्शवले आहे. सावधगिरी बाळगणे आणि लसीकरण हे दोनच पर्याय आहेत. गेल्या वर्षी लसीकरण झाले नव्हते. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु करुन जास्तीत जास्त लसीकरण केले पाहिजे. मिशन टेस्टिंग बकवास आयडिया असून चित्रपटगृहाच्या बाहेर आणि मॉलच्या बाहेर जे लोक येत आहेत, त्यांना तुम्हीच पकडता आणि जबरदस्तीने ट्रेस करता. त्यांच्याकडून २५० रुपये घेतले जातात. त्याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहिजे. पण लॉकडाऊन नको, असे स्पष्ट मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.

जे सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांना लॉकडाऊनचा विरोध करण्यासाबंधी बोलणार आहे, लोकांच्या मनामध्ये लॉकडाऊनची खूप भीती आहे. बेरोजगारी, भूकबळी पुन्हा येईल अशी भीती त्यांना वाटत असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले आहे.