राज्यात काल दिवसभरात ‘एवढ्या’ कोरोनाबाधितांची वाढ


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आरोग्य विभागाकडून दररोज हजारोंच्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांचा आकडा प्रसिद्ध करत परिस्थिती किती गंभीर वळणावर पोहोचली आहे, याची माहिती देण्यात येते. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात 20854 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून, त्यांना रग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, काल दिवसभरात 31 हजार 643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

राज्यात नव्याने आढळणाऱ्य़ा कोरोनाबाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमीच दिसत आहे. राज्यात सध्याच्या घडीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्यूदर 1.98 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे 102 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राज्यात विविध भागांमध्ये 336584 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यात तब्बल 1607415 जण गृह विलगीकरणात आहेत. तर, 16614 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. पुढील काही दिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यांवरच राज्यात लागू असणारे निर्बंध आणखी कठोर होणार का याबाबतचा निर्णय अवलंबून असणार आहे.