बांगलादेशात हिंसाचार, हिंदू मंदिरावर कट्टरपंथियांकडून हल्ला


ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार भडकला असून हिंदू मंदिरावर शेकडो कट्टरवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. हा हल्ला पूर्व बांगलादेशातील रेल्वे गाडीवर आणि मंदिरावर करण्यात आला असून हिंसेखोरांविरोधात सुरक्षा रक्षकांनी कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या हिंसाचारात किमान 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे रॉयटरने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ही हिंसा नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध म्हणून काही इस्लामिक कट्टरवाद्यांनी घडवून आणली आहे.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर पोहोचले. या वर्षी बांगलादेश 50 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. तसेच हेच वर्ष वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहे. तसेच या वर्षी भारत आणि बांग्लादेशच्या संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बांग्लादेशची निवड केली होती.

पंतप्रधानांचा रविवारी दौरा संपला. त्यावेळी भारताने बांगलादेशला कोरोना लसीचे एक कोटी 20 लाख डोस भेट म्हणून देण्यात आले. बांगलादेशातील इस्लामिक कट्टरवादी गटाचे म्हणणे आहे की, भारतात मुस्लिम लोकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेदभाव करतात. त्यांनी त्यावरुन मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध केला होता.

या हिंसेखोरांविरोधात सुरक्षा रक्षकांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व भागातील रेल्वे गाड्यांसोबत हिंदू मंदिरावर या कट्टरवाद्यांनी हल्ला केला. तसेच या परिसरातील सरकारी कार्यालयातील कागदपत्रेही पेटवण्यात आली. ढाक्यातील अनेक रस्ते या हिंसेखोरांनी बंद केले.