मीठी नदीत सचिन वाझेविरोधात सापडला पुराव्यांचा ‘खजिना’


मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत सापडेलेली स्फोटके आणि याच संबंध मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय या प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. निलंबित पोलीस अधिकारी आणि आरोपी सचिन वाझे यांना या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने ( NIA ) रविवारी बीकेसी येथे मीठी नदीच्या पुलावर नेले. सचिन वाझेने हार्ड डिस्क मीठी नदीत फेकली होती, असा दावा एनआयएने केला आहे.

नदीत मोठ्या पोलीस सुरक्षेत १२ जणांना उतरवण्यात आले. कम्प्युटरचे दोन सीपीयू, गाड्यांचे दोन नंबर प्लेट, एक लॅपटॉप आणि इतर काही सामान नदीतून काढण्यात आले. दोन्ही नंबर प्लेट्सवर एकच नंबर आहे. या सर्व वस्तू ह्या मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेले स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणाशी संबंधित असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच एनआयएने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला आहे.

सचिन वाझेने एनआयएच्या अटकेपूर्वी हार्ड डिस्क, मोबाइल फोन आणि या प्रकरणाशी संबंधित इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तत्पूर्वी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी २५ मार्चला सचिन वाझेला ठाण्याजवळील रेती बंदर येथे नेले होते. या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेवर मनुसख यांच्या हत्येचा आरोप केला आहे.

दरम्यान ३ एप्रिलपर्यंत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आधी २५ मार्चपर्यंत एनआयएच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यात ३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एनआयएने सचिन वाझेला अटक केली होती.

दुसरीकडे, याप्रकरणावरुन राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सामना’मधून गृहमंत्री अनिल देशमुखांवर टीका केली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख हे अॅक्सिडेंटल गृहमंत्री असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊतांना उत्तर देत आघाडीत मिठाचा खडा टाकू नका, असे सुनावले आहे. यामुळे आघाडीतील राजकारण तापले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशी आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे ही चौकशी करण्यात येणार आहे. आपणच मुख्यमंत्र्यांकडे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशीची मागणी केली होती, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिल्यामुळे आघाडीत काहीसे बिघाडी झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.