बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया


मुंबई – रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली. अचानक पोटदुखीचा पवार यांना त्रास सुरू झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पवार यांच्या तपासण्यात करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. ३१ मार्च रोजी पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या पोटात रविवार सायंकाळी दुखू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी यावेळी त्यांची तपासणी केली. तपासणीतून त्यांना पित्ताशयाचे निदान झाल्यामुळे शरद पवार यांना पुन्हा ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.


आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. त्यांच्या पोटात काल संध्याकाळी दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे. शरद पवारांना हा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना देण्यात येणारी रक्त पातळ करण्याची औषधे थांबवण्यात आली आहेत. ३१ मार्च २०२१ रोजी त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार असून तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे.