होळीसाठी घरच्या घरी तयार करा रसायनविरहित रंग

colour
होळीचा सण आला की अनेक रंगांनी न्हाऊन निघालेले, उत्साहाने आणि आनंदाने भरलेले वातावरण आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र या सणासाठी वापरले जाणारे कोरडे रंग जर अनेक तऱ्हेची रसायने वापरून तयार केलेले असले, तर मात्र यांचे दुष्परिणाम त्वचेवर होऊ शकतात. त्वचेची आग होणे, पुरळ येणे, त्वचा रुक्ष, कोरडी होणे याचबरोबर अनेकांना या रंगांमुळे श्वास घेण्यासही त्रास जाणवितो. अशा वेळी संपूर्णपणे नैसर्गिक पदार्थ वापरून बनविलेले जैविक (organic) रंग वापरणे सर्वार्थाने सुरक्षित ठरते. असे रंग आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध असले, तरी सामान्य रंगांच्या मानाने पुष्कळच महाग असतात. त्यामुळे संपूर्णपणे नैसर्गिक, रसायनविरहित पदार्थ असलेले आणि त्वचेसाठी अपायकारक न ठरणारे रंग आपण घरच्या घरी देखील तयार करून होळीचा आनंद शकतो.
colour1
होळीसाठी संपूर्णपणे नैसर्गिक लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदीची फुले सावलीमध्ये वाळवून त्यांची पूड करावी. ही पूड पाण्यामध्ये मिसळली तर ओला रंग म्हणूनही वापरता येऊ शकते, अथवा कोरडा रंग म्हणून ही पूड वापरावी. त्याचबरोबर रक्तचंदनही लाल रंग म्हणून ओले किंवा कोरडे वापरता येऊ शकते. रक्तचंदन वापरून ओला रंग बनविण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये दोन चमचे रक्तचंदनाची पूड घालून हे पाणी उकळावे आणि थंड झाल्यावर या पाण्यामध्ये आणखी थोडे पाणी मिसळून याचा वापर रंग म्हणून करावा. केशरी रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावीत, किंवा ही फुले पाण्यामध्ये घालून पाणी उकळावे. या फुलांमुळे पाण्याला सुंदर केशरी रंग येतो. जर कोरडा रंग हवा असेल, तर ही फुले सावलीमध्ये वाळवून त्यांची पूड करावी.
colour2
पिवळा रंग तयार करण्यासाठी शंभर ग्राम हळद, पन्नास ग्राम झेंडूची फुले, २० ग्राम संत्र्याच्या वाळविलेल्या सालाची पूड, २०० ग्राम आरारूट पावडर आणि अर्धा चमचा लिंबाच्या सुवासाचे इसेन्शियल ऑईल हे सर्व पदार्थ चांगले मिसळून याची पूड करावी. जकरंदाची फुले किंवा निळी जास्वंद वाळवून सुंदर निळा रंग तयार करता येऊ शकतो, तर ओला हिरवा रंग तयार करण्यासाठी कडूलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळावीत आणि कोरडा रंग तयार करण्यासाठी मेहंदी पावडर आणि बेसन हे मिश्रण समप्रमाणात वापरावे. गुलाबी रंग तयार करण्यासाठी गुलाबी जास्वंदीची फुले सावलीत वाळवून त्यांची पूड करावी, किंवा बीट किसून घेऊन हा कीस उन्हामध्ये चांगला कोरडा होईपर्यंत वापरावा. कीस वाळल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घ्यावा आणि यामध्ये बेसन मिसळून कोरडा रंग म्हणून वापर करावा. ओला गुलाबी रंग तयार करण्यासाठी बीटाचे तुकडे पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी थंड झाल्यावर त्याचा वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment