गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी करणार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश


नागपूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्या या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली, एनआयए या प्रकरणाचा धागेदोरे शोधण्यासाठी तपास करत आहेत, यातच ठाकरे सरकारने वाझेंचे निलंबन करत मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांचीही उचलबांगडी केली. राज्यात सध्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे प्रकरण गाजत आहे. अनिल देशमुख यांची याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: अनिल देशमुख यांनी दिली.

सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला १०० कोटी कलेक्शनचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. विरोधकांनी या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याप्रकरणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे, या पत्रात म्हटले आहे की, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नसल्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुधका दुध, पानीका पानी करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांनी केली आहे. तसेच, मंत्रिमंडळ बैठकीतही ही मागणी केली असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. तसेच, जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फतच चौकशी करावी, असे मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसनेही म्हटल्याचे नाना पटोले यांनी सांगितल्यामुळे आता या चौकशीसाठी कोणत्या न्यायाधीशांना नेमण्यात येईल आणि चौकशीनंतर काय सत्य बाहेर येईल, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.