घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावे यासाठी आजमावा काही वास्तू टिप्स

vastu
आपले घर हे आपले विश्रांतीचे, परिवारासोबत एकत्र राहून आनंदाचे क्षण व्यतीत करण्याचे स्थान असते. घरातील वातावरण सकारात्मक असेल, तर त्याचा प्रभाव घरातील मंडळींच्या आरोग्यावर आणि मनस्थितीवरही होत असतो. त्या उलट जर घरातील वातावरण नकारात्मक असेल तर घरामध्ये सतत वाद, कलह, आर्थिक नुकसान, आरोग्यासंबंधी तक्रारी उद्भवू लागतात. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी आणि त्याद्वारे घरातील मंडळींची मनस्थिती प्रसन्न आणि आपापसात सौख्य राहण्यासाठी काही विशेष उपाय वास्तूशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत.
vastu1
वास्तूशास्त्राच्या अनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला शक्यतो हलका रंग दिलेला असावा. घराचा मुख्य दरवाजा काळ्या, किंवा गडद राखाडी रंगाचा असू नये. त्याचबरोबर घराच्या प्रवेशद्वारापाशी दिवसा आणि रात्री भरपूर उजेड राहील याची दक्षता घेतली जावी. घरामध्ये राहणाऱ्या मंडळींसाठी किंवा घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी चपला ठेवण्याचे कपाट किंवा स्टँड प्रवेशद्वाराच्या बाहेर, दरवाजाला लागून असू नये. त्याऐवजी हा स्टँड किंवा कपाट मुख्य दरवाजाच्या आतमध्ये एका बाजूला असणे चांगले.
vastu2
घरामध्ये उभ्याने पूजा केली जात असल्यास देवघर जमिनीवर न ठेवता, देवघरामध्ये असणारे देव आपल्या दृष्टीच्या समोर, म्हणजेच ‘आय लेव्हल’वर असतील अशा रीतीने देवघर मांडले जावे. तसेच हे देवघर शक्यतो लाकडी किंवा संगमरावरी असणे शुभ मानले गेले आहे. देवघर नेहमी पूर्वेला किंवा उत्तर-पूर्वेला असणे चांगले. या दिशांना सकारात्मक उर्जेचे संचरण अधिक असते. घरामध्ये दक्षिण-पूर्व दिशेला लावलेली पणतीची किंवा निरांजनाची ज्योत घरामध्ये सकारात्मक वातावरण आणणारी आहे.
vastu3
घरातील मुख्य बैठकीची खोली पूर्वेला, उत्तरेला, उत्तर-पूर्वेला किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला असणे चांगले. घरातील टीव्ही, म्युझीक सिस्टम इत्यादी उपकरणे बैठकीच्या खोलीमध्ये दक्षिण-पूर्वी दिशेला असावीत. बैठकीच्या खोलीतील जड फर्निचर, उदाहरणार्थ सोफा, खोलीच्या पश्चिमेला असावा. झोपण्याची खोली घरामध्ये दक्षिण-पश्चिम दिशेला असणे चांगले मानले जाते. बेडरूममध्ये झोपताना आपले डोके पश्चिमेकडे राहील अशा पद्धतीने बेड ठेवलेला असावा. बेडच्या बरोबर समोरच्या भिंतीवर आरसा लावणे टाळावे. त्यामुळे घरामध्ये कलह उत्पन्न होत असल्याचे वास्तूशास्त्र सांगते. जर घराच्या सभोवताली अंगण असेल, तर ते स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. अंगणामध्ये कुठेही कचरा, सांडपाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

Leave a Comment