शरद पवार नक्की शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे हे तपासण्याची गरज : नाना पटोले


मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी युपीएचे अध्यक्ष पद शरद पवार यांना देण्यात यावा संजय राऊत यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवार हे नक्की शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत हे तपासण्याची गरज आहे. शिवसेनेचे संजय राऊत हे खासदार आहे, हे आम्हाला माहिती आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत, हे देखील आम्हाला माहित आहे. पण त्यांचे नवे रूप अलीकडच्या काळात आम्हाला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे सध्याच्या घडीला राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांचे प्रवक्त्यासारखे वागत आहेत. त्यामुळे हे योग्य नाही. या युपीएचा जे हिस्साच नाहीत, त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, असा टोला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहे. आमच्या नेत्यांवर जर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार, हे आम्ही निश्चितपणे त्यांना ठणकावून सांगणार आहे. सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकार नाही हे पहिल्या दिवशी सांगितले आहे. ते ज्या पवार साहेबांची येथे वकिली करत आहेत. ती वकिली त्यांनी थांबवावी, असा सल्ला पटोले यांनी राऊतांना दिला आहे .

नाना पटोले म्हणाले, आपल्या देशात कोरोना आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा असा आरोप पटोले यांनी यावेळी केला आहे. तसेच महाआघाडीची सत्ता आल्यानंतर भाजप चिडलेली मांजर बनली आहे आणि त्याचाच परिणाम आज आपण बघत आहोत. भाजप जनतेच्या सर्व प्रश्नांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राला कसे बदनाम करता येईल, असे प्रयत्न करत आहे. सचिन वाझे आणि मनसुख प्रकरण सर्वांना माहित आहे. एटीएस कारवाई करत असताना जिलेटीन नागपुरवरून आणण्यात आले.

केंद्रीय यंत्रणा या सर्व प्रकरणाचे तपास करत आहे. परंतु तपासयंत्रणेने दर दिवशी प्रसारमाध्यमांच्यामार्फत माहिती दिली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तर दुसरीकडे एका प्रकरणाला दाबण्यासाठी दुसरे प्रकरण समोर आणत राज्याला बदनाम करण्याचे काम करीत आहे.