इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेमध्ये होणार हरित इंधनाचा वापर : के. सिवन


बंगळुरु : आपले पहिले अंतराळ मिशन ‘गगनयान’ मध्ये हरित इंधन वायूचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून इस्रो प्रयत्न करत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. इस्रोच्या सर्व मोहिमांमध्ये येत्या काळात हरित इंधनाचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इस्रो ऑस्ट्रेलिया सरकारशी कोको बेटावर गगनयान मिशनसाठी ग्राऊंड स्टेशन उभे करण्यासाठी बोलणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, ऑस्ट्रेलियामध्ये इस्रोला NAVIC ग्राऊंड स्टेशन उभे करायचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते शुक्रवारी इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते. जागतिक स्तरावर नेतृत्व करायची इस्रोची महत्वाकांक्षा नसल्याचेही के. सिवन यांनी सांगितले.

के, सिवन म्हणाले की, भारतातील अंतराळ क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि इतर गरजांची पूर्ती करणे हे इस्रोचे मुख्य ध्येय आहे. इस्रोच्या मोहिमांचा देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इतर सर्वच क्षेत्राला कसा फायदा होईल यावर आमचा भर आहे. के. सिवन हरित इंधनासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, आगामी काळात हरित इंधनाचा वापर करणे अत्यावश्यक असेल. आम्ही गगनयान मिशनमध्ये हरित इंधनाचा वापर करणार आहे. या आधीच तसे नियोजन इस्रोने केले असून त्याची संपूर्ण तयारीही झाली आहे. इस्रोच्या सर्वच मिशनमध्ये आगामी काळात हरित इंधनाचा वापर करण्यात येणार असून ती काळाची गरज असल्यामुळे बहुतेक विषारी आणि धोकादायक अशा सर्व घटकांचे निर्मूलन शक्य होणार आहे.

लवकरात लवकर रॉकेट लॉन्च व्हेईकलमध्ये पारंपरिक इंधनाला पर्यायी अशा हरित इंधनाचा वापर करण्याचा आमचा मानस असल्याचे के. सिवन यांनी सांगितले. कोरोनाचा फटका इस्रोच्या गगनयान मिशनला बसल्याचे दिसत आहे. 2022 पर्यंत या मिशनच्या माध्यमातून तीन भारतीयांना अंतराळात पाठवायचे इस्रोचे ध्येय होते.