असे मिळते विमानतळांना आर्थिक उत्पन्न


कोणताही विमानतळ आणि त्यावरील सर्व व्यवस्था सुरळीत सुरु ठेवणे हे काम मोठे अवघड आणि जिकीरीचे आहे. पण त्याचबरोबर सर्व विमानतळ हे आर्थिक उत्पन्नाचेही स्रोत असल्याने येथील व्यवस्था अतिशय चोख असणे महत्वाचे ठरते. जगभरातील बहुतेक देशांतील प्रमुख विमानतळ त्या त्या देशांची सरकारी मालमत्ता असली, तरीही आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा मोठा व्यवसाय म्हणून विमानतळाची सुविधा ओळखली जाते. हे आर्थिक उत्पन्न विमान तळांना निरनिराळ्या मार्गे प्राप्त होत असते. जगामध्ये केवळ काहीच विमानतळ असे आहेत, जिथे केवळ सामानाची ( कार्गो) ने-आण करण्यासाठी विमाने येत-जात असतात. पण बहुतेक सर्वच विमानतळांवर प्रवासी विमानांचेच आवागमन जास्त असते. ह्या विमानांसाठी आणि ह्यांच्या मार्फेत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी सुविधा पुरविणे हे विमानतळाच्या आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

ह्याचे उदाहरण म्हणजे लंडन येथील हीथ्रो विमानतळ. उदाहरण जरी हीथ्रोचे असले, तरी जगभरातील सर्वच मोठ्या आणि व्यस्त विमानतळांच्या बाबतीत हे कमी अधिक प्रमाणात लागू आहे. हीथ्रो विमानतळावरून दररोज ६५० विमाने उड्डाण करीत असतात. मात्र प्रवासी विमानांच्या संख्येच्या तुलनेमध्ये कार्गो विमानाच्या आवागमनाची संख्या येथे कमी आहे. ह्या विमानतळाला त्याच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नातील काही भाग, येथून प्रवास करणाऱ्या सुमारे ७८ मिलियन प्रवाश्यांच्या मार्फत मिळत असतो. हीथ्रो हा जगातील सहावा मोठा विमानतळ असून, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. हा विमानतळ संपूर्णपणे खासगी मालमत्ता असून, ब्रिटीश सरकारचा ह्यामध्ये कोणताही आर्थिक वाटा ( स्टेक) नाही. विमानतळासारखी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून त्याचे रुपांतर उत्तम आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठीच्या व्यवसायात कसे करता येईल ह्याचे उदाहरण हीथ्रोच्या रूपात आपल्या समोर आहे.

हा विमानतळ आणि त्यावरील व्यवस्था सुरळीत चालावी ह्यासाठी, एका वर्षाला १.५ बिलियन डॉलर्स इतका खर्च येतो. ह्यामध्ये हीथ्रोवर काम करणाऱ्या ६,५०० कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही समवेश आहे. वास्तविक हीथ्रो विमानतळावर ७६,००० कर्मचारी कार्यरत असतात. त्यातील केवळ ६,५०० कर्मचारी, हीथ्रो विमानतळ ज्यांची खासगी मालमत्ता आहे अश्या ‘हीथ्रो एअरपोर्ट होल्डिंग्ज’ चे कर्मचारी असून, विमानतळावरील व्यवस्थापनाची जबाबदारी ह्या कर्मचाऱ्यांची असते. उर्वरित ७०,००० कर्मचारी हीथ्रोवर कार्यरत असणाऱ्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. ह्यांमध्ये निरनिराळ्या विमान कंपन्यांतील कर्मचारी, प्रवाश्यांचे सामान किंवा अन्य कार्गो हाताळणारे (बॅगेज हँडलिंग) कर्मचारी, विमानांची वाहतूक नियंत्रित करणारे कर्मचारी (एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स), तसेच विमानतळावरील निरनिरळ्या रेस्टॉरंटस् आणि रिटेल स्टोअर्स मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ह्याशिवाय रेंटल कार कंपनी, रेंटल बस सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचाही ह्यामध्ये समावेश असतो.

विमानतळ कार्यरत ठेवण्याकरिता, सतत व्यग्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय इतरही अनेक खर्च असतात. ह्यामध्ये विमानतळाची निगा राखणे, पाणी, वीज, इंटरनेट इत्यादी सुविधांसाठी होणारे खर्च असतात. अश्या प्रकारे एकूण खर्च लक्षात घेतला, तर हीथ्रो विमानतळ कार्यरत ठेवण्यासाठी एकूण १.५ बिलियन डॉलर्सचा वार्षिक खर्च होतो. १.३ मिलियन जनसंख्या असलेल्या स्वाझीलंड सारख्या देशाच्या वार्षिक खर्चापेक्षा हीथ्रोचा खर्च कितीतरी जास्त आहे. ह्यावरूनच एवढा मोठा विमानतळ कार्यरत ठेवण्याची जबाबदारी किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येईलच. कुठलाही व्यवसाय कार्यरत ठेवण्यासाठीचा खर्च भरून काढून त्याच्या व्यतिरिक्त निव्वळ नफाही मिळविला तर तो व्यवसाय खऱ्या अर्थाने सफल होत असतो. विमानतळ देखील एक व्यवसाय आहे हे पाहता, त्यालाही हेच सूत्र लागू पडते. त्यामुळे विमानतळ चालविण्यासाठी लागणारा खर्च भरून काढून त्या व्यतिरिक्त निव्वळ नफा कसा मिळविला जातो हे जाणून घेणे मोठे रोचक ठरते.

हीथ्रो विमानतळ, प्रवाश्यांना सुविधा पुरविण्यासाठी, दर प्रवाश्यामागे १९ डॉलर्स खर्च करीत असते. विमानतळ करीत असलेला हा खर्च प्रवाश्यांच्याकडूनच अप्रत्यक्ष रीत्या भरून काढण्यात येत असतो. विमानतळावर बाहेरून आलेले प्रवासी विमानातून उतरल्यानंतर आपले सामान घेऊन, आवश्यक त्या औपचारिकता पार पाडून त्वरित विमानतळाच्या बाहेर पडत असतात. हे प्रवासी विमानतळावर फारसे रेंगाळत नाहीत. मात्र विमानतळावरून उड्डाण करणारे प्रवासी विमानतळावर जास्त काळ थांबतात. प्रवास करण्यासाठी आवश्यक त्या सर्व औपचारिकता (चेक इन, कस्टम्स, इमिग्रेशन) पूर्ण करून बहुतेक प्रवासी विमानाची वेळ होईपर्यंत विमानतळावरील रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी करणे किंवा रेस्टॉरंटस् मध्ये काही तरी खाणे पसंत करीत असतात. ह्याच कारणासाठी एअरपोर्टवरील रिटेल स्टोअर्स किंवा रेस्टॉरंटस् नेहमी ‘डीपार्चर’ (प्रस्थान) टर्मिनल मधेच पाहायला मिळतात. प्रवाश्यांना जास्तीत जास्त वेळ खरेदी करिता किंवा रेस्टॉरंटस् मध्ये जेवणाच्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी मिळावा ह्यासाठी ‘चेक इन’ आणि इतर औपचारिकता झटपट उरकण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल असतो.

असे करण्यामागे व्यावहारिक चतुरता हे मुख्य कारण आहे. विमानतळावर असणाऱ्या प्रत्येक रिटेल स्टोअर किंवा रेस्टॉरंटमध्ये येणारा प्रत्येक प्रवासी जितक्या किमतीची खरेदी करेल, त्या रकमेतील काही हिस्सा विमानतळ व्यवस्थापनाला द्यावा लागतो. त्यामुळे ह्या स्टोअर्समध्ये जितक्या वस्तू विकल्या जातील, त्यातील मिळकतीचा एक ठराविक हिस्सा विमानतळ व्यवस्थापनाच्या हक्काचा असतो. ह्यामध्ये रेस्टॉरंटकडून दर प्रवाश्यामागे ९५ सेंट्स, रिटेल स्टोअर्स कडून ५.१५ डॉलर्स, दर पार्किंग मागे २.०३ डॉलर्स, आणि व्हीआयपी लाउंज, रेंटल कार सुविधा इत्यादी सुविधांसाठी दर प्रवाश्यामागे ३.०४ डॉलर्स इतकी कमाई विमानतळ करीत असतात. त्यातून लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून पॅडीन्ग्टन स्टेशनकडे जाण्यासाठी ट्रेन सुविधा उपलब्ध आहे. ह्या ट्रेनने प्रवास करण्याऱ्या दर प्रवाश्यामागे एक ठराविक रक्कमही विमानतळ व्यवस्थापनाला मिळत असते. थोडक्यात प्रवाश्यांवर होणारा खर्च प्रवाश्यांच्या कडूनच कसा भरून घ्यायचा ही युक्ती हीथ्रो विमानतळाने अचूक अंमलात आणली आहे. ह्या विमानतळावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे विमान उभे असलेल्या बोर्डिंग गेट ची माहिती उड्डाणाच्या केवळ ४५ ते ९० मिनिटे आधी दिली जाते. त्यामुळे बहुतेक प्रवासी विमानतळाच्या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या रिटेल स्टोअर्स आणि रेस्टॉरंटस् च्या परीसरामधेच राहणे पसंत करतात. त्याशिवाय विमानतळावर असणारी ‘ड्युटी फ्री’ वस्तूंची स्टोअर्सही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असतात.

दर प्रवाश्यामागे १९ डॉलर्स खर्च करणारे हीथ्रो ह्यापैकी १३ डॉलर्स अप्रत्यक्षपणे प्रवाश्यांच्या कडूनच मिळविते. मग उरलेले सहा डॉलर्स विमानतळ व्यवस्थापनाला कसे मिळतात? ही कमाई होते विमानतळावर येणाऱ्या विमानांकडून. विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक विमानामागे, विमानतळाला त्या त्या विमान कंपन्यांकडून सरासरी ९,५०० डॉलर्सचे उत्पन्न मिळते. ह्यामध्ये गेटची उपलब्धता, चेक इन एरिया, आणि प्रत्यक्ष रन-वे टाईम ह्या सर्व सुविधांसाठी ही रक्कम आकारली जात असते. त्याचप्रमाणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक विमानातील दर प्रवाश्यामागेही ठराविक रक्कम विमान कंपनी विमानतळाला देत असते. अश्या रीतीने सर्व सुविधा मिळून हीथ्रोला दर प्रवाश्यामागे तीस डॉलर्सचे उत्पन्न मिळत असते. त्यामुळे हीथ्रो बद्दल बोलायचे झाले, तर दर प्रवाश्यामागे होणारा १९ डॉलर्सचा खर्च भरून काढून त्या व्यतिरिक्त ११ डॉलर्सचा निव्वळ नफा हीथ्रोला मिळत असतो.

Leave a Comment