असा साजरा होत असे आरके स्टुडिओमध्ये होळीचा सण

holi
आर के स्टुडियोज मध्ये दरवर्षी साजरी होणारी होळी समस्त बॉलीवूडकरिता आकर्षणाचा विषय असे. या होळीच्या सणासाठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, इत्यादी सर्व कलाकार मंडळी आवर्जून हजेरी लावीत असत. रंगांनी भरलेल्या मोठमोठ्या हौदांमध्ये न्हाऊन निघालेली सर्व मंडळी मोठ्या जल्लोषाने हा सण साजरा करण्यासाठी एकत्र येत असत. आजही या ठिकाणी होळीचा सण साजरा होत असला, तरी पूर्वीचा उत्साह मात्र आजच्या काळाच्या अनुषंगाने बदलला असल्याचे अभिनेते रझा मुराद म्हणतात. रझा मुराद यांनी आरके स्टुडियोज मध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीबद्दलच्या त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत.
holi1
आरके स्टुडियो मधील होळीमध्ये तऱ्हेतऱ्हेचे भोजन आणि भांग यांची रेलचेल असे. स्टुडियोमध्ये एक मोठा हौद तयार करण्यात येत असून येथे येणाऱ्या प्रत्येकाला या हौदातील रंगाच्या पाण्यामध्ये रंगवून काढले जात असे. केवळ बॉलीवूडमधील नामांकित कलाकारच नाही, तर अनेकदा हॉलीवूडमधील कलाकार देखील या होळीसाठी उपस्थित रहात असत. आरके स्टुडीयोज मधील होळी इतकी खास असे, की बॉलीवूड कलाकारांपैकी प्रत्येकाची या उत्सवामध्ये सहभागी होण्याची इच्छा असे. मात्र काळ बदलला, तशी होळी साजरी करण्याची पद्धत जरी बदलली असली, तरी आरके स्टुडीयोजमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणाच्या आठवणी आजही ताज्या असल्याचे मुराद म्हणतात.

Leave a Comment